मंत्री रमेश जारकीहोळी भाजपच्या ‘पंगतीत’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बंगळूर - मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारलेले बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी बुधवारी (ता. १९) भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते.

बंगळूर - मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारलेले बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी बुधवारी (ता. १९) भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते. मंत्री जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्‍यता यापूर्वीच असल्याने  त्याची नव्याने चर्चा सुरू झाली. रमेश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्‍यता असून आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मंत्री जारकीहोळी मंत्रिमंडळाची बैठक, काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक किंवा काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांना सातत्याने गैरहजर राहत आहेत. भाजपच्या स्नेहभोजनाला मात्र त्यांची 
उपस्थिती अवर्जून होती. मंत्री जारकीहोळी यांच्यासह काही आमदारांना भाजपची हवा लागली आहे. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. रमेश जारकीहोळी व बी. एस. येडियुरप्पा यांनी एकाच टेबलजवळ बसून स्नेहभोजन केल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी येडियुरप्पा यांच्यासह काही भाजप नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

मंत्री जारकीहोळी यांच्या या वर्तनामुळे काँग्रेस गोटात चलबिचल सुरू झाली आहे. मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्तक्षेपाला सातत्याने आक्षेप घेणारे रमेश जारकीहोळी काँग्रेस नेत्यांविरुध्द उघडपणे बोलत आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी अधिवेशनात बेळगावाला आल्यानंतर त्यांनी जारकीहोळींशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचाही उपयोग झाल्याचे दिसून आलेले नाही. हिवाळी अधिवेशनानंतर ऑपरेशन कमळला जोर येण्याची शक्‍यता यातून वर्तविण्यात येत आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर, के. एस. ईश्वरप्पा, आर. अशोक, उमेश कत्ती यांच्यासह भाजपचे नेते व आमदार उपस्थित होते.

१३ पैकी ३ बैठकांना हजर
मंत्रिमंडळाच्या १३ बैठकांपैकी रमेश जारकीहोळी केवळ ३ बैठकांनाच उपस्थित होते. एका बैठकीत तर ते अर्ध्यावरच उठून गेले होते. बेळगावच्या पीएलडी बॅंक निवडणुकीनंतर ते पक्षाच्या कार्यक्रमापासूनही दूर राहिले आहेत. बेळगावात झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीलाही ते अनुपस्थितीत होते. काँग्रेसमधील काही नाराज आमदारांच्या बैठका घेऊन ते त्यांचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात असतात. या सर्व करणावरून त्यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्याऐवजी सतीश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Minister Ramesh Jarkiholi on the BJP way