सिंधूने जिंकले होते कांस्यपदक !

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

इयत्ता 7 वी 10 तील विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध झाली असून, त्यात तथ्यात्मक आणि व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. काही पुस्तकांमध्ये शब्दांबरोबर मधली पानेही गायब असल्याचेही निदर्शनास आले आहे.

बंगळूर - गेल्या वर्षी पार पडलेल्या रिओ ऑलंपिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रौप्य नव्हे; तर कांस्यपदक जिंकले होते, असा चुकीचा इतिहास कर्नाटकमधील विद्यार्थी आता शिकणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी नव्याने दाखल झालेल्या शालेय पुस्तकांत गंभीर चुका झाल्याचे स्पष्ट झाले असून, यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

इयत्ता 7 वी 10 तील विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध झाली असून, त्यात तथ्यात्मक आणि व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. काही पुस्तकांमध्ये शब्दांबरोबर मधली पानेही गायब असल्याचेही निदर्शनास आले आहे. कन्नड भाषेत असलेल्या इयत्ता 7 वीच्या एका पुस्तकात 24 ते 57; तर 10 वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 53 ते 84 ही पाने गायब आहेत; तसेच सातवीच्या गणिताच्या पुस्तकात प्रश्नाऐवजी फक्त उत्तरे छापण्यात आल्याचेही दिसून येते.

ही पुस्तके मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कल्पनेतून अस्तित्वात आली आहेत. 2014 मध्ये तत्कालीन भाजप सरकारने शालेय पुस्तकात केलेले बदल हटविण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांनी घेत यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने शिक्षण क्षेत्रातील 185 तज्ज्ञ व्यक्तींशी दोन वर्षे सल्लामसलत केल्यानंतर ही पुस्तके तयार झाली. या प्रक्रियेवर 45 लाख; तर पुस्तकांच्या 6 कोटी प्रती छापण्यासाठी सुमारे 144 कोटी रुपये खर्च आला आहे. मात्र, गंभीर चुकांमुळे ही रक्कम पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सायना बनली सानिया...
नव्याने दाखल झालेल्या पुस्तकांत बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्या नावाऐवजी टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक दोन्ही खेळाडूंचा क्रीडाप्रकार वेगळा असताना ही चूक झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुकीची माहिती गेली आहे.

Web Title: Mistakes in school books