आश्रय घरात राहणारा माजी आमदार दत्तू हक्‍यागोळ 

आश्रय घरात राहणारा माजी आमदार दत्तू हक्‍यागोळ 

चिक्कोडी - गरीबांसाठी असणाऱ्या सरकारी योजनेच्या आश्रय घरातला आमदार, अशी ख्याती असलेल्या माजी आमदार दत्तू हक्‍क्‍यागोळ (वय 77, रा. केरुर, ता. चिक्कोडी) यांचा आज (ता.28) अपघातात मृत्यू झाला. 2004 साली तत्कालीन चिक्कोडी विधानसभा मतदार संघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून राजकारणात येऊन आमदार झाल्याने ते राज्याच्या राजकीय पटलावर एकेकाळी झळकले होते. 

आमदार होण्यापूर्वी ते 1986 ते 1991 या काळात जिल्हा पंचायत व 2001 पासून ग्राम पंचायत सदस्यही होते. हक्‍क्‍यागोळ हे तत्कालीन खासदार रमेश जिगजिनगी यांचे निकटवर्तीय होते. त्यांना चिक्कोडी या राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनीच भाजपची उमेदवारी मिळवून दिली होती. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार एस. एस. भीमन्नवर यांचा 2500 मतांनी पराभव केला होता. 

अत्यंत शांत व मनमिळावू आमदार म्हणून ते परिचित होते. एका आश्रय घरात वास्तव्यास असूनही त्यांना आमदारकी मिळाली. आजअखेर ते या घरातच वास्तव्यास होते. काही काळ त्यांनी उदरनिर्वाहासाठी दोऱ्या वळण्याचा व्यवसायही केला होता. आमदार असतानाही आणि नसतानाही ते बसनेच प्रवास करत. अगदीच गरज असल्यास दुचाकीवर कोणालातरी घेऊन जात. आजकाल राजकारणात नवखे असलेले व साधे ग्रा. पं. सदस्य झाले तरी चारचाकी घेऊन मिरविणारी मंडळी गल्लोगल्ली दिसतात. पण त्यांच्यासमोर चारचाकी वाहनही नसलेले हक्‍क्‍यागोळ हे आदर्श व्यक्तिमत्त्व ठरावेत असे उदाहरण होते. 

सर्वसामान्य नागरिकांनीच आपणास निवडून दिल्याने आमदार झाल्याचे ऋण ते वारंवार व्यक्त करीत. त्यामुळेच कोणत्याही अन्यायाच्या ठिकाणी किंवा आंदोलनात हिरीरीने सहभागी होत. अधिकार असले तरी अधिकारी वर्गाशीही ते विनम्रतेने वागत असत. त्यामुळे प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आदर होता. त्यांच्या निधनामुळे चिक्कोडी परिसर व केरुर गावात शोककळा पसरली आहे. 

जिल्ह्यातील एक प्रामाणिक व मनमिळाऊ माजी आमदार हक्‍क्‍यागोळ यांच्या जाण्याने गमावला. चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलनात त्यांच्या सक्रीय सहभाग होता. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या आधीपासून ते आंदोलनात सक्रीय होते. चिक्कोडी जिल्हा व्हावा, ही त्यांची अंतिम इच्छा होती. त्यांच्या जाण्याने एक सच्चा आंदोलक गमावल्याचे दुखः आहे. 
- बी. आर. संगाप्पगोळ, 

चिक्कोडी जिल्हा आंदोलन नेते 

संबंधीत बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com