डिजिटल व्यवहारांसाठी बक्षिसांची खैरात 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सुशासन दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारच्या 'लेस कॅश' मोहिमेसाठीच्या महत्त्वाकांक्षी 'भाग्यवान ग्राहक' आणि 'डिजी धन व्यापारी योजनां'ना आज सुरवात झाली. येत्या शंभर दिवसांत शंभर शहरांमध्ये डिजिटल मेळाव्यांमार्फत या योजना जनसामान्यांपर्यंत पोचविल्या जातील. सोडतीद्वारे भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल, तर 14 एप्रिलला महासोडत काढली जाणार आहे. 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सुशासन दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारच्या 'लेस कॅश' मोहिमेसाठीच्या महत्त्वाकांक्षी 'भाग्यवान ग्राहक' आणि 'डिजी धन व्यापारी योजनां'ना आज सुरवात झाली. येत्या शंभर दिवसांत शंभर शहरांमध्ये डिजिटल मेळाव्यांमार्फत या योजना जनसामान्यांपर्यंत पोचविल्या जातील. सोडतीद्वारे भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल, तर 14 एप्रिलला महासोडत काढली जाणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या योजनांचे उद्‌घाटन झाले. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा उद्देश आणि त्यापासून होणारे फायदे विशद केले. रोख चलन समाप्त होऊ शकत नाही, त्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, असा दावा करताना जेटली यांनी हे (लेस कॅश) आकलन होण्यास राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांना वेळ लागतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, की जनतेने मोदी सरकारला देश बदलण्यासाठी निवडून दिले आहे. डिजिटल इंडिया, कॅशलेस हे प्रकार देश बदलण्याचे आहेत. 'डिजिटल इंडिया'चा अर्थ इमानदार प्रशासन आणि मजबूत भारत असा आहे. 

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी या योजनेची माहिती दिली. पॅराऑलिंपिक विजेत्या दीपा मलिक यांनी नोटाबंदीचा निर्णय हा देशात सकारात्मक बदल घडवून आणणारा असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी क्रिकेटपटू गौतम गंभीरने डेबिट कार्डद्वारे वीजबिल भरण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. 
देशातील शंभर शहरांत डिजिटल मेळावे आयोजित केले जाणार असून, त्यामध्येही सोडत काढली जाणार आहे. दररोज होणाऱ्या आठ कोटी ऑनलाइन व्यवहारांमधून पहिल्या सोडतीमध्ये 15 हजार विजेते निवडण्यात आले. मात्र, विजेत्यांची नावे जाहीर झालेली नाहीत. बॅंक खातेधारकांचे ग्राहक क्रमांक यामध्ये निवडण्यात आले आहेत. हा तपशील संबंधित बॅंकांना कळविला जाणार असून, उद्यापर्यंत बॅंकांमार्फत या विजेत्यांची नावे कळविली जातील. 

दर आठवड्याला सात हजार बक्षिसे 
बॅंकांमार्फत झालेल्या ई-व्यवहारांसाठी 13 एप्रिलपर्यंत बक्षिसे दिली जाणार आहेत. सरकारतर्फे जाहीर केलेल्या चार पद्धतींनुसार ई- व्यवहार करणाऱ्यांनाच यामध्ये सहभागी होता येईल. तीन हजार रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारांना योजनेत सहभागी केले जाणार नाही. केवळ 50 रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या आर्थिक व्यवहारांसाठी ही योजना आहे, तर डिजिटल धन व्यापारी योजनेमध्ये व्यावसायिकांना बक्षीस दिले जाणार आहे. यामध्ये दर आठवड्याला सात हजार बक्षिसे देण्यात येतील. बक्षिसाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत असेल.

Web Title: Modi cabinet presses for Digital Cash Transactions