गर्दीनेच सांगितले जिंकणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सत्ताधारी सपने राज्यातील शेतकऱ्यांना दुःखी केले आहे. शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करण्यात सपला अपयश आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढील समस्यांमध्ये भर पडली आहे. काम करण्याचे सोडून सप राजकारण करण्यात व्यस्त असून, शेतकऱ्यांना केंद्र सरकारविरोधात भडकावण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप मोदींनी केला

लखनौ - उत्तर प्रदेशमधील समाजवादी व बहुजन समाजवादी पक्षाने राज्याला विकासापासून वंचित ठेवले असून, भारतीय जनता पक्षास संधी दिल्यास येथील गेल्या चौदा वर्षांचा वनवास संपेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील जनतेला दिले. सभेला उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय हा राज्यात भाजपच सत्तेत येणार याचे प्रतीक असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित परिवर्तन रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, "सत्ताधारी सप व त्यापूर्वी सत्तेत असलेल्या बसपने राज्यातून विकासाला हद्दपार केले असून, विकास करणे हे कधीही त्यांचे ध्येय नव्हते. उत्तर प्रदेशचा विकास साधला नाही, तर पर्यायाने देशाचा विकासही खुंटणार आहे.'

एक पक्ष स्वतःच्या कुटुंबातील कलह मिटविण्यात व्यस्त आहे, तर दुसरा पक्ष स्वतःचा पैसा वाचविण्यासाठी झुंजत आहे, अशी टीका मोदींनी सप, बसपवर केली. एक पक्ष असा आहे की, स्वतःच्या मुलाला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रयत्नशील आहे आणि त्याचे अस्तित्व राज्यात कोठेही जाणवत नाही, असा चिमटाही त्यांनी कॉंग्रेसला काढला. ते म्हणाले, राज्यातील जनता या पक्षांचे वास्तव जाणून आहे. अशा पक्षांच्या हाती सत्ता सोपविणे याचा अर्थ असा की, ते निवडणुकीनंतर आपल्या कुटुंबात व पैशात व्यस्त होतील आणि सामान्य माणूस दुर्लक्षित होईल. भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो येथील जनतेला गैरकारभार व कुशासनापासून वाचवू शकतो.

सत्ताधारी सपने राज्यातील शेतकऱ्यांना दुःखी केले आहे. शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करण्यात सपला अपयश आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढील समस्यांमध्ये भर पडली आहे. काम करण्याचे सोडून सप राजकारण करण्यात व्यस्त असून, शेतकऱ्यांना केंद्र सरकारविरोधात भडकावण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप मोदींनी केला.

Web Title: Modi confidant of victory