मी उंदीरच शोधत होतो- मोदींचा विरोधकांना चिमटा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : "डोंगर पोखरून उंदीर काढला, असे नोटाबंदीबद्दल काही लोक म्हणाले. परंतु मी उंदीरच शोधत होतो, कारण उंदीर सगळंच चोरत आणि खात राहतो," असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. 

नवी दिल्ली : "डोंगर पोखरून उंदीर काढला, असे नोटाबंदीबद्दल काही लोक म्हणाले. परंतु मी उंदीरच शोधत होतो, कारण उंदीर सगळंच चोरत आणि खात राहतो," असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. 

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्लीत डिजीधन मेळाव्यामध्ये ‘भिम’ हे अॅप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या अॅपद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून 'डोंगर पोखरून उंदीर काढला' अशी टीका केली होती. त्यावरून मोदी यांनी त्यांचा उल्लेख न करता प्रत्युत्तर दिले. 
ते म्हणाले, "काही लोक म्हणतात, हे काहीतरी नवीन आणलंय मोदींनी. काहीतरी गडबड आहे. मग मोठे लोक हळूच म्हणतात हे कसे होणार, मोबाईल कुठे आहेत? भिम या अॅपच्या माध्यमातून देशाला 2017 साठी उत्कृष्ट भेट देत आहे."

या अॅपमुळे अंगठा लावून पेमेंट करता येईल. हे अॅप म्हणजे गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल. अशिक्षितांना एकेकाळी अंगठे बहाद्दर म्हणून हिणवलं जायचं, परंतु काळ बदलला असून, तुमचा अंगठाच आता तुमची ओळख बनला. तीच तुमची बँक असेल, असे मोदी म्हणाले.

कॅशलेसला प्रोत्साहनाबद्दल मोदींनी माध्यमांचे आभार मानले. योजना आखण्यात व उपक्रम राबविण्यात माध्यमांची मदत झाली असे ते म्हणाले. 

Web Title: modi launches bhim mobile app