(राहुल) बालिश; अखिलेशच्या बुद्धिमतेविषयी शंका:मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कॉंग्रेसचा "तो' नेता इतका बालिशपणा करतो; की राजकीय नेत्यांवर इंटरनेटवर असलेल्या विनोदांपैकी सर्वांत जास्त विनोद त्याच्यावर आहेत. मात्र अखिलेश यांनी त्याच्याबरोबर हातमिळवणी केली...

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश राज्यामधील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सोडले. उत्तर प्रदेश राज्यात सध्या निवडणुकीचा ज्वर ऐन भरात असून या पार्श्‍वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी आज समाजवादी पक्षाच्या सरकारला लक्ष्य केले.

"राज्यातील निवडणुकीच्या काही काळ आधीच येथील सरकारने समजावादी पक्षाच्या गुंडगिरीचा सामना करु शकतील अशा लोकांची यादी बनविली. भारतीय जनता पक्षाच्या निष्पाप समर्थकांना अटक करुन तुरुंगामध्ये डांबण्यात आले,'' असे मोदी यांनी सांगितले. राज्यातील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचारास आज प्रारंभ झाला. या वेळी बोलताना पंतप्रधानांनी समाजवादी पक्ष व कॉंग्रेसमधील युतीस लक्ष्य केले.

"कॉंग्रेसचा "तो' नेता इतका बालिशपणा करतो; की राजकीय नेत्यांवर इंटरनेटवर असलेल्या विनोदांपैकी सर्वांत जास्त विनोद त्याच्यावर आहेत. त्याच्यापासून कॉंग्रेसमधील नेतेही लांब राहणे पसंत करतात. मात्र अखिलेश यांनी त्याच्याबरोबर हातमिळवणी केली. यामुळे मला अखिलेश यांच्या बुद्धिमत्तेविषयी शंका वाटू लागली,'' असा प्रखर हल्ला मोदी यांनी चढविला.

मोदी यांनी यावेळी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्यावरही टीका केली. मुलायम यांनी बलात्कार करणाऱ्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

Web Title: Modi slams Rahul, Akhilesh Yadav