esakal | 'उद्या मी बंगालला न जाता कोरोनाची बैठक घेणार'; मोदींच्या ट्विटवर लोकांनी मानले आभार

बोलून बातमी शोधा

'उद्या मी बंगालला न जाता कोरोनाची बैठक घेणार'; मोदींच्या ट्विटवर लोकांनी मानले आभार
'उद्या मी बंगालला न जाता कोरोनाची बैठक घेणार'; मोदींच्या ट्विटवर लोकांनी मानले आभार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशात दिवसेंदिवस परिस्थिती विदारक बनत चालली असून कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून जवळपास अडीच लाखांच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर काल बुधवारी देशात आढळेला कोरोना रुग्णांचा आकडा हा डोळे विस्फारणारा आहे. काल एका दिवसांत देशात 3 लाख 15 हजारच्या आसपास रुग्ण सापडले आहेत. एकीकडे देशात ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त असल्यावरुन त्यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवण्यात येत आहे. एकीकडे 'दवाई भी, कडाई भी' असं म्हणत घराबाहेर पडू नका असं आवाहन मोदी करताना दिसतात तर दुसरीकडे कोरोनाच्या कसल्याही नियमावलीचं पालन न करणाऱ्या पश्चिम बंगालच्या प्रचारसभेत जमलेल्या गर्दीबद्दल तिथल्या लोकांचं कौतुक करताना मोदी दिसतात. मोदींच्या या दुहेरी वागणुकीबद्दल सध्या ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका ट्विटवर सध्या टीकेची झोड उठली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलंय की, उद्या मी एका उच्चस्तरिय बैठकीतून देशातील सध्यस्थितील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे मी उद्या पश्चिम बंगालला जाणार नाहीये.

हेही वाचा: कोरोनाच्या लाटेचे संकट ‘मोदीनिर्मित’; ममता बॅनर्जी

हेही वाचा: ''मोदी-शहा दिल्लीचे दोन गुंड''; ममतादीदींची बोचरी टीका

यावर अनेक ट्विटर युझर्सनी रिप्लाय देत मोदींवर टीका केली आहे. एका युझरने म्हटलंय की, तुमचं हा त्याग वाखणण्याजोगा आहे. एकाने म्हटलंय की, मोदींचं हे ट्विट ते हाय लेव्हल मीटींग घेतायत हे सांगण्यासाठी नसून ते पश्चिम बंगालला जात नाहीयेत, हे सांगण्यासाठी आहे. आणखी एका युझरने म्हटलंय की, तुम्ही पंतप्रधान असून प्रचारक नसल्याचं समजून घेतल्याबद्दल तुमचे आभार! आणखी एका युझरने म्हटलंय की, ही एक उच्चस्तरिय बैठक असल्याने कृपा करुन गृहमंत्र्यांना देखील या बैठकीत घ्या.

हेही वाचा: हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

कोर्टाने केंद्राला फटकारलं

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा भासत आहे. यातच आता सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून केंद्राला नोटीस पाठवून फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवून विचारलं आहे की, केंद्राकडे कोरोनाला रोखण्यासाठी काय राष्ट्रीय योजना आहे?

राहुल गांधींनीही केलं होतं आवाहन

याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनाची विदारक परिस्थिती पाहता सर्व प्रचारसभा रद्द केल्या होत्या. तसेच त्यांनी पंतप्रधानांसहित विरोधकांना आवाहन केलं होतं की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांनी देखील असाच निर्णय घ्यावा. त्यांच्या या निर्णयाची टर उडवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर भाजपने पश्चिम बंगालमधील सर्व मोठ्या सभा रद्द करत लहान सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आजही गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमध्ये तीन रॅली झाल्या आहेत.

देशातील कोरोना परिस्थिती विदारक

देशात बुधवारी (ता.२१) दिवसभरात सुमारे ३ लाख १५ हजार ८०२ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. या आधी अमेरिकेत ८ जानेवारीला जगात सर्वाधिक ३ लाख ७ हजार रुग्ण आढळून आले होते. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोचली आहे. दिवसभरात १ लाख ७८ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८४ हजार ६५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही २२ लाख ९१ हजार ४२८ वर पोचली आहे. तसेच आतापर्यंत १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत २७ कोटी २७ लाख ५ हजार १०३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात १६ लाख ५१ हजार ७११ जणांची चाचणी करण्यात आली.