मोदी लाट, भल्याभल्यांना 'गंगेचा घाट'; 'उडता पंजाब' कॉंग्रेसकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 मार्च 2017

सत्तांतराची धुळवड
तीनशे जागांचा टप्पा पार केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. उत्तर प्रदेशात 'न भूतो, न भविष्यती' विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभरातील भाजपच्या पक्ष कार्यालयांसमोर एकच जल्लोष सुरू झाला.

नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत सुरू झालेला भाजपच्या यशाचा वारू आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात चौफेर उधळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या विकासाच्या राजकारणाने विभागलेल्या विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी या दोन्ही ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पंजाबमधील मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला असून, स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे येथे कॉंग्रेसचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मणिपूरवगळता इतर चारही राज्यांत मतदारराजाने प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण 403 जागांपैकी तब्बल 324 जागा खिशात घालून भाजप आघाडीने घवघवीत यश प्राप्त करत देशातील सर्वांत मोठ्या राज्यात विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरवातीपासूनच भाजपने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. समाजवादी पक्षाला 47 जागा, तर कॉंग्रेसला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागले असून, बसप 19 जागांसह तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. राष्ट्रीय लोक दलाला एक जागा मिळाली असून, अपक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपला 312 जागा, अपना दलाला (सोनेलाल) नऊ जागा आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या.

भाजप आणि सप-कॉंग्रेस यांना कमी-अधिक फरकांनी सारख्याच जागा मिळतील आणि विधानसभा त्रिशंकू होईल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. तो मतदारांनी साफ खोटा ठरवला. तीनशे जागांचा टप्पा पार केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. उत्तर प्रदेशात 'न भूतो, न भविष्यती' विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभरातील भाजपच्या पक्ष कार्यालयांसमोर एकच जल्लोष सुरू झाला.
उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये सुसाट निघालेल्या भाजपच्या वारुला पंजाबमध्ये मात्र 'ब्रेक' लागला आहे. प्रस्थापितविरोधी कौलामुळे सत्तारूढ शिरोमणी अकाली दल-भाजपला पराभवाचा फटका बसला. तेथे कॉंग्रेसने दहा वर्षांनंतर जोरदार मुसंडी मारून, स्पष्ट बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. अकाली दल (15 जागा) तिसऱ्या क्रमांकावर तर भाजप (3 जागा) चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. आम आदमी पक्षानेही (आप) पंजाबात चांगली कामगिरी (20 जागा) केली असली, तरी त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आज वयाची 75 वर्षे पूर्ण करणारे कॉंग्रेस नेते कॅ. अमरिंदरसिंग हे आपला वाढदिवस साजरा करत होते. राज्यातील मतदारांनी कॉंग्रेसकडे सत्ता देत अमरिंदरसिंग यांना एक प्रकारे वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.

उत्तराखंडात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज मतदारांनी सपशेल फोल ठरवला. भाजपने 57 जागांवर विजय प्राप्त केला, तर कॉंग्रेसच्या वाट्याला अवघ्या 11 जागा आल्या. राज्यातील कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री हरीश रावत यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. ते स्वतः किच्चा आणि हरिद्वार ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले.

गोव्यात सत्ताधारी भाजपच्या विरोधात मतदारांनी कौल दिला असून, येथे कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मतदारांनी धूळ चारली असून, मोठ्या मताधिक्‍याने त्यांचा पराभव झाला आहे. गोव्यात 'आप'ची बरीच हवा करण्यात आली होती. मात्र, या पक्षाला एकही जागा न देत मतदारांनी 'झाडू'ला पूर्णपणे नाकारले आहे. 'नोटा' पर्यायाचा वापर करण्यात गोव्यातील मतदारांनी आघाडी घेतली आहे. गोव्यात 1.2 टक्के मतदारांनी हा पर्याय निवडला.

मणिपूरमध्ये निकाल जाहीर होताना सुरवातीपासूनच चुरस होती ती शेवटपर्यंत कायम राहिली. बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 31 जागांचा टप्पा कुठल्याही पक्षाला गाठता आला नसला तरी कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने मणिपूरमध्ये चांगली कामगिरी केली असून, 21 जागांसह तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी दहा हजारपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला. त्यांच्या विरोधातील उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना अवघ्या 90 मतांवर समाधान मानावे लागले.

Web Title: modi wave again sweeps out opponents in up, congress regains punjab