नेपाळसाठी भारत शेर्पाही बनायला तयार 

पीटीआय
रविवार, 13 मे 2018

आज दोन्ही देश क्रिकेटच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात आहेत. एक नेपाळी तरुण हा "आयपीएल'चा घटक आहे. क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील लोकसंपर्क अधिक मजबूत होईल. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

काठमांडू - नेपाळला यशोशिखरावर पोचविण्यासाठी भारत शेर्पा बनायला तयार आहे, या देशाने बुलेट्‌सपासून बॅलेटपर्यंत केलेला प्रवास स्तुत्य असून, नेपाळने युद्ध ते बुद्ध (युद्धाकडून शांततेकडे) असा दीर्घ प्रवास केला आहे. तुम्ही आता बॅलेटपर्यंत पोचला असला तरीसुद्धा आणखी बरीच वाटचाल करणे बाकी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते येथे नागरी सत्कार समारंभामध्ये बोलत होते. 

मोदी म्हणाले, ""नेपाळ आता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोचला असून, आणखी मुख्य चढाई शिल्लक आहे. गिर्यारोहकांना शिखरावर नेण्याचे काम शेर्पा करत असतात, भारतही नेपाळसाठी शेर्पाप्रमाणे काम करायला तयार आहे. नेपाळने आपला प्राधान्यक्रम निश्‍चित करावा. या विकासाच्या प्रवासात भारत नेपाळच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. तुमच्या यशातच आमचे यश सामावले आहे. तुम्ही सुखी तर आम्हीही सुखी. "सब का साथ, सब का विकास' ही घोषणा भारताच्या प्रगतीबाबत असली तरीसुद्धा वैश्‍विकतेबाबतही बरंच काही सांगते.'' 

मोदी म्हणाले 
भारताने नेहमीच जगासाठी काम केले 
सौर आघाडीत अन्य देशांना एकत्र आणले 
नेपाळचा राज्यघटनेचा स्वीकार स्तुत्य 
भारत तुमच्या प्रगतीचा साथीदार आहे 
काठमांडू हे नेपाळमधील दुसरे विश्‍वच 
भविष्यात लुंबिनीला भेट देण्याची इच्छा 

तोडगा निघणार 
भारत नेपाळमधील द्विपक्षीय मुद्द्यांवर 19 सप्टेंबरपर्यंत तोडगा काढण्याचा निर्धार उभय देशांनी केला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी 2015 मध्ये नेपाळची नवीन राज्यघटना अमलात आली होती. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त निवेदनामध्ये याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. 
 

Web Title: Modi wraps up Nepal visit says India ready to be economic Sherpa