मोदीजी, पुन्हा संधी नाही; बुलेट ट्रेनची घाई करा- अखिलेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

राज्यातील वीजपुरवठ्यावर टीका करणारे भाजपचे गोरखपूर येथील खासदार योगी आदित्यनाथ यांनाही अखिलेश यांनी सोडले नाही. ते म्हणाले, की येथे जवळच एक 'बाबा' आहेत. ज्यांनी वीजपुरवठ्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. मी एवढेच म्हणू शकतो, 'बाबाजी' तुम्ही फक्त विजेच्या तारांना स्पर्श करा आणि बघा वीज आहे किंवा नाही.

देवरिया (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर 'बुलेट ट्रेन' आणावी; कारण त्यांना केंद्रात सत्तेची पुन्हा संधी मिळणार नाही, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी यांच्या 'बुलेट ट्रेन'च्या आश्‍वासनाची खिल्ली उडवली आहे.

येथे समाजवादी पक्षाच्या प्रचार फेरीदरम्यान अखिलेश म्हणाले, की तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या मोदी यांना तेथे साधी मेट्रोही आणता आली नाही. आम्ही 'मेट्रो ट्रेन' सुरू केली आहे. त्यासाठी तीन ठिकाणी कामे सुरू केली आहेत. तुमची 'बुलेट ट्रेन' कुठे आहे? ती ट्रेन कुठे गेली? तुमच्या सरकारला तीन वर्षे होत आहेत. कृपया घाई करा; कारण तुम्हाला केंद्रात पुन्हा संधी मिळणार नाही.

मोदींवर टीका करताना ते म्हणाले, की मोदी यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून उत्तर प्रदेशचा विकास थंडावला आहे. सध्या सर्वत्र परीक्षा सुरू आहेत. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांतही पेपर फोडणारे पकडले गेले आहेत. मोदीजी, जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते तेव्हा तुम्ही कोणाची कॉपी करून 'तो' सूट शिवला होता, ते सांगा. आम्हाला ती व्यक्ती माहीत आहे, ज्याने त्याचे नाव स्वतःच्या सूटवर छापले होते तेच तुम्ही केलेत मोदीजी.

राज्यातील वीजपुरवठ्यावर टीका करणारे भाजपचे गोरखपूर येथील खासदार योगी आदित्यनाथ यांनाही अखिलेश यांनी सोडले नाही. ते म्हणाले, की येथे जवळच एक 'बाबा' आहेत. ज्यांनी वीजपुरवठ्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. मी एवढेच म्हणू शकतो, 'बाबाजी' तुम्ही फक्त विजेच्या तारांना स्पर्श करा आणि बघा वीज आहे किंवा नाही.

Web Title: modiji, hurry up for bullet train, akhilesh yadav