मोदीजी तुघलक तर योगी औरंगजेबसारखे : काँग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

 ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत''.

- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

नवी दिल्ली : ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत'', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज (शुक्रवार) निशाणा साधला. तसेच या देशात तालिबानी व्यवस्था चालणार की लोकशाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुरजेवाला बोलत होते. ते म्हणाले, ''राजस्थान आणि तेलंगणातील जागरूक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. या दोन्ही राज्यातील भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी जनता उत्सुक आहे. या निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला येतील. त्यानंतर देशात सकारात्मक बदल घडतील. विकास आणि प्रगतीची सुरवात होईल. या पाचही राज्यात काँग्रेस पक्षाची प्रचारमोहिम सकारात्मक झाली''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''आदित्यनाथ यांची संस्था काँग्रेस नेत्याचे शीर कापणाऱ्याला बक्षिस देणार आहे. त्यामुळे त्यांनी यावर उत्तर देणे गरजेचे आहे. देशात आता लोकशाही शिल्लक राहिली आहे का? अशा प्रकारचे वक्तव्य करणे, ही भाजपची प्रथा बनली आहे. मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत. ते देशातील सर्वात मोठे औरंगजेब बनले आहेत. या देशात तालिबानी व्यवस्था लागू होणार का? आम्ही त्याची निंदा करतो. आदित्यनाथ आणि मोदींनी त्याकडे लक्ष द्यायला हवे''. 

Web Title: Modiji is like Tughlaq and Yogi Aurangzeb says Congress Leader Randeep Singh Surjewala