आता चोरांच्या सरदारांवर हल्ला

पीटीआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

पंतप्रधान मोदी : "काळे धन आणि मन' दोन्हीही लक्ष्य

पंतप्रधान मोदी : "काळे धन आणि मन' दोन्हीही लक्ष्य

डेहराडून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा विरोधकांना धारेवर धरले. सरकारने स्वच्छता मोहीम सुरू केली असून, आता आम्ही चोरांच्या सरदारांवर वार केला आहे. आमचा संघर्ष केवळ काळ्या धनाच्या विरोधात नसून, तो काळे मन असणाऱ्यांशीदेखील आहे. तुम्ही लोकांनी मला केवळ पंतप्रधानच नाही, तर या देशाचा रखवालदारदेखील बनविले आहे. आता मी माझे काम प्रामाणिकपणे करत असताना काही लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी येथे परिवर्तन रॅलीमध्ये बोलताना केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज चारधाम महामार्ग विकास योजनेसह बारा हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या योजनांच्या माध्यमातून सर्व ऋतूंमध्ये टिकाव धरतील अशा महामार्गांची निर्मिती केली जाणार आहे.

नोटाबंदीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, की यामुळे दहशतवाद, अमली पदार्थ, बनावट चलनांची निर्मिती करणारे आणि मानवी तस्करीमध्ये सहभागी असणाऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. प्रामाणिक लोकांना मदत व्हावी म्हणूनच आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात युद्ध छेडले आहे. कधीकाळी आपला देश "सोने की चिडियॉं' होता पण भ्रष्टाचाराने आम्हाला उद्‌ध्वस्त केले, त्यामुळे भ्रष्टाचार थांबायलाच हवा. लोकांना त्रास होत असतानादेखील त्यांनी त्यांनी या लढाईत आमची साथ दिल्याचे मोदींनी सांगितले.

गांधी कुटुंबीयांवर टीका
पंतप्रधान मोदी यांनी "वन रॅंक, वन पेन्शन'च्या मुद्द्यावरून गांधी कुटुंबीयांवर कडाडून हल्ला केला. मागील चाळीस वर्षांपासून माझे जवान ही योजना लागू करावी अशी मागणी करत होते; पण अनेक वर्षे देशावर सत्ता गाजविणाऱ्या पक्षाने त्याची साधी दखलही घेतली नाही. या योजनेसाठी केवळ दहा हजार कोटींचे बजेट हवे असताना, कॉंग्रेसने त्यांची मागणी का पूर्ण केली नाही? आमच्या सरकारने या योजनेअंतर्गत 6 हजार 600 कोटी रुपयांचे वाटप केले असून, उर्वरित रक्कम लवकरच दिली जाईल, असे मोदी यांनी नमूद केले.

गडकरींची श्रावणबाळाशी तुलना
रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे नेहमीच जगभरातील चांगल्या गोष्टींचा शोध घेत असतात. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही रस्तेनिर्मितीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली. शंभर वर्षे टिकून राहतील असे रस्ते तयार करण्यावर गडकरींचा भर आहे. जगभरातील सल्लागार कंपन्या या प्रकल्पामध्ये सहभागी झाल्या असून, आगामी काही दिवसांत आपण जेव्हा उत्तराखंडची यात्रा कराल तेव्हा चांगल्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील. तेव्हा मात्र श्रावणबाळाऐवजी हे सरकार आणि नितीन गडकरी यांची आपणास आठवण होईल, असे मोदी म्हणाले.

Web Title: Modi's fight against Black money