Narendra Modi : मोदींचा शपथविधी रविवारी शक्य

भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शपथविधीच्या कार्यक्रमासाठी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलावले जाणार आहे.
Narendra Modi
Narendra Modisakal

नवी दिल्ली : भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शपथविधीच्या कार्यक्रमासाठी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलावले जाणार आहे. यात श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपने शुक्रवारी सकाळी ११ वाजता संसदीय मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

मोदी यांच्या शपथविधीचा कार्यक्रम शनिवारी होण्याची शक्यता याआधी वर्तविण्यात आली होती. आता विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडे उपलब्ध असलेल्या वेळांशी मेळ घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे साधारणत: रविवारी सायंकाळी सहा वाजता शपथविधीचा कार्यक्रम होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू हे रविवारी शपथ घेणार होते, त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आता १२ तारखेला होण्याची शक्यता आहे. नायडू हे दिल्लीत शुक्रवारी होणाऱ्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. जनसेनेचे अध्यक्ष पवन कल्याण तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमिवर भाजपने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संसदीय मंडळाची बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्र, हरियानावर लक्ष

लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक मोठ्या राज्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या अनुषंगाने पक्ष नेतृत्वाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाना अशा काही प्रमुख राज्यांत पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून आगामी काळात पराभवाचे विश्लेषण करणारा अहवाल मागविला जाऊ शकतो, असे समजते. आगामी काळात महाराष्ट्र आणि हरियानामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यांवर सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे आधीच केली आहे. त्यावर पुढे काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सरस कामगिरीची भाजपला अपेक्षा होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक तसेच प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांना सुमार कामगिरीचे विश्लेषण देण्यास सांगण्यात आले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com