
याच प्रकारचे मोनोलिथ तब्बल तीस देशांमध्ये आजवर आढळून आले आहेत.
अहमदाबाद : सध्या जगात कोरोना सोबतच आणखी एक गोष्ट चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे जगातील विविध देशांमध्ये अचानकपणे आढळून येणारे मोठ्या आकाराचे धातूचे स्तंभ. याला मोनोलिथ या नावाने संबोधले जाते. मोठ्या आकाराचे पट्टीसारखे दिसणारे धातूंचे हे स्तंभ सध्या आश्चर्याचा तसेच चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे असाच एक मोनोलिथ आता भारतात देखील आढळून आला आहे. गुजरात राज्यातील अहबादमधील एका पार्कमध्ये हा आश्चर्यकारक मोनोलिथ आढळून आला आहे.
याआधी हा मोनोलिख जगात इतरही ठिकाणी आढळला होता. सध्या अहमदाबादमधील थालतेज येथील सिम्फॉनी पार्कमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात इतर ठिकाणी आढळलेल्या धातूच्या मोनोलिथशी हा स्तंभ देखील बराच मिळताजुळता आहे. विशेष म्हणजे त्रिकोणी आकाराचा हा स्तंभ चमकदार आहे. जगात अचानकच सगळीकडे आढळून येणारे या प्रकारचे मोनोलिथ चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र गुजरात मध्ये आढळलेला मोनोलिथ बऱ्यापैकी सारखा असला तरीही तो काय सांगण्याचा प्रयत्न करतोय याचं रहस्य अद्याप बाकी आहे.
हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 20,036 नवे रुग्ण; महाराष्ट्रात 58 रुग्णांचा मृत्यू
या मोनोलिथवर एका बाजूला काही आकडे कोरलेले असून जवळून पाहिल्यास ते दिसून येतात. हे आकडे पर्यावरणाविषयीचे संवर्धन आणि जंगली प्राण्यांचे संरक्षण याबाबतची गरज बोलून दाखवतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, नेमकं काय रहस्य आहे ते येणाऱ्या काळातील संशोधनानंतरच स्पष्ट होऊ शकेल. सिम्फॉनी पार्कमध्ये या प्रकारचा मोनोलिथ आढळला आहे हे कळताच त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. अनेकजणांनी यासोबत सेल्फी, फोटोही काढले आहेत. या मोनोलिथ संदर्भात सध्या अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अहमदाबाद महानगरपालिकेचे सहाय्यक निर्देशक दिलीपभाई पटेल यांनी या मोनोलिथबाबत कल्पना असल्याचं नमूद केलं आहे. तसेच या पार्कच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या एका खासगी कंपनीद्वारे हा मोनोलिथ उभारला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हा पार्क नुकताच सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते तीन महिन्यांपूर्वीच या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या पार्कची जबाबदारी पाच वर्षांसाठी एका कंपनीला देण्यात आली आहे. या प्रकारचा मोनोलिथ यापूर्वी अमेरिकेतील उताहमध्ये आढळला होता. नंतर तो गायब देखील झाला होता. त्यानंतर याच प्रकारचे मोनोलिथ तब्बल तीस देशांमध्ये आजवर आढळून आले आहेत.