मॉन्सून आज बंगालच्या उपसागरात दाखल होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सध्या मॉन्सूनने अंदमान व निकोबारचा भाग व्यापला आहे, त्यामुळे या भागात जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १७) मॉन्सूनचे बंगाल उपसागराच्या आग्नेय व अंदमान समुद्राच्या उत्तरेकडील काही भागात आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात आगमन झाले आहे. 

पुणे - मॉन्सूनला अंदमानाच्या उत्तर भागाकडून बंगालच्या उपसागराकडे पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. येत्या चोवीस तासांमध्ये आज (गुरुवारी) मॉन्सून बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सध्या मॉन्सूनने अंदमान व निकोबारचा भाग व्यापला आहे, त्यामुळे या भागात जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १७) मॉन्सूनचे बंगाल उपसागराच्या आग्नेय व अंदमान समुद्राच्या उत्तरेकडील काही भागात आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात आगमन झाले आहे. 

सध्या बंगालच्या उपसागरात हवेचा दाब १०४ हेप्टापास्कल आहे. बंगालचा उपसागर सुरू होतो तेथे हा हवेचा दाब आहे. मध्यवर्ती ठिकाणी १००२ हेप्टापास्कल आहे, तर उत्तरेकडे एक हजार आहे. वारा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहे, त्यामुळे बंगालच्या उपसागरात माॅन्सून लवकर व्यापण्याची शक्यता आहे. तसेच, केरळातही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र माॅन्सून पुढे सरकण्यासाठी पोषक असल्याने लवकरच केरळातही माॅन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. तसेच, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग ते तमिळनाडूचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 

उत्तर प्रदेशातील आग्नेय भाग आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच, बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या उत्तर भागाकडे सरकत असून, ते सुमद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Monsoon to advance into Bay of Bengal by today