अंदमानसह बंगालच्या खाडीवर नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मॉन्सूनचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंदमानसह बंगालच्या खाडीवर नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मॉन्सूनचे आगमन

अंदमानसह बंगालच्या खाडीवर नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मॉन्सूनचे आगमन

नवी दिल्ली - तो‘ कधी येणार याची प्रतीक्षा संपली आहे. अंदमानसह बंगालच्या खाडीवर नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मॉन्सूनचे आगमन झाले आहे, अशी आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आज दिली. उन्हाच्या तप्त झळा आणि किमान १५ राज्यांत सरासरी ४५ अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे देशभरात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने त्रासलेल्या नागरिकांना मान्सूनच्या वेळेआधीच्या आगमनामुळे काहीशी मुक्तता मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. यंदा देशात नेहमीपेक्षा ५ दिवस आधी मॉन्सून येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील वर्षी २० जूनला देशात मान्सूनचे आगमन झाले होते. यावर्षी त्याच्याही ५ दिवस आधी मान्सूनने देशात दमदार ‘दस्तक' दिली ही बातमी दिलासा देणारी आहे. गेले काही दिवस असह्य उन्हाळ्याने लोक त्रस्त झाले आहेत. परिणामी आगामी काही दिवसांत केरळमध्ये येणारा मान्सून देशाच्या अन्य भागांतही वेळेआधीच हजेरी लावेल अशीही आशा निर्माण झाली आहे. आयएमडीच्या यापूर्वीच्या अंदाजानुसार केरळमध्ये २७ मे रोजी मान्सूनचे आगमन होणे शक्य आहे.

आयएमडीचे अधिकारी आर के जेनामणी यांनी मान्सूनच्या आगमनाची माहिती देताना सांगितले की अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या खाडीवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. या आठवड्यात केरळ, तमिळनाडू, बिहार, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, लक्षद्वीप, मेघालय,पश्चिम बंगाल, सिक्किम या राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच्या अंदाजानुसार केरळमध्ये नेहमीपेक्षा लवकर म्हणजे २७ मे रोजी मान्सूनचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.

लक्षद्वीप व तमिळनाडू किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या आगमनाची परिस्थिती निर्माण झाल्याने या आठवडाभरात दुसरीकडे उन्हाच्या तप्त झळांनी त्रासलेल्या दिल्करांसाठीही सुखद बातमी अशी आहे की दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान या उष्णतेची लाट आलेल्या राज्यांतील कमाल तापमान पुढील काही दिवसांत काहीसे म्हणजे २ ते ३ डिग्री सेल्सिअसने खाली येईल. दिल्लीत आजपासून पुढील २-४ दिवसांत वादळी वारे वाहतील व हलका पाऊसही होईल असा अंदाज आयएमडीने वर्तविला.

दिल्लीत रविवारी ४९ अंशांच्याही पुढे पारा गेल्याने व सोमवारीही तीच परिस्थिती कायम राहिल्याने नागरिक तप्त झळांनी हैराण झाले आहेत.