"मॉन्सून'ची देवभूमीला धडक 

"मॉन्सून'ची देवभूमीला धडक 

नवी दिल्ली/ कोची : अवघी भारतभूमी ज्याच्या आगमनाकडे आतुरतेने डोळे लावून बसली आहे, त्या मॉन्सूनने आज अखेर केरळ आणि तमिळनाडूला धडक दिली. केरळमधील अनेक भागांमध्ये जोराचा पाऊस कोसळत असल्याचे हवामान खात्याचे नियोजित महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. हा पाऊस बारा तारखेपर्यंत दक्षिण कोकणामध्ये येणार असून, त्यानंतर मुंबईतील त्याचे आगमन रखडण्याची शक्‍यता आहे. सर्वसाधारणपणे 1 जून रोजी येणाऱ्या या पावसाने यंदा आठवडाभर विलंबाने एंट्री केली आहे. सोमवारपर्यंत "मॉन्सून'च्या वाटचालीमध्ये आणखी प्रगती होऊ शकते. 

सध्या देशभरातील बळिराजा वरुणराजाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला असून, पश्‍चिम आणि दक्षिण भागातील जलशयांमधील पाण्याची पातळीदेखील प्रचंड खालावली आहे. पुढील 48 तासांमध्ये केरळच्या किनारी भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला असून, यामुळे पश्‍चिम भागातील मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा पूर्व दिशा किंवा वायव्येकडे सरकला, तर यामुळे मॉन्सूनची वाटचाल अधिक वेगाने होऊ शकेल, पण तोच जर ओमानच्या किनारपट्टीकडे गेल्यास मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मोहपात्रा यांनी नमूद केले. दरम्यान, जून महिन्यामध्ये मात्र मॉन्सूनवर "अल-निनो'चा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्याची वाटचाल आणखी मंदावेल, अशी भीती व्यक्त होते आहे. 

ऑरेंज ऍलर्ट 
हवामान खात्याने उद्या (ता.9) रोजी केरळच्या आठही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता वर्तविली असून, तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, मल्लाप्पुरम आणि कोझीकोडसाठी ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे. मॉन्सून 13 जून रोजी कर्नाटक किनारपट्टीवर पोचू शकतो. 

ईशान्येकडे अतिवृष्टीची शक्‍यता 
मध्य प्रदेश, राजस्थानात उष्णतेची लाट 
"दिल्ली-एनसीआर'मध्ये मात्र विलंबाने पाऊस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com