गहू, तांदळापेक्षा दूधाचे उत्पादन अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Banas Dairy

गहू, तांदळापेक्षा दूधाचे उत्पादन अधिक

बनासकांठा : गहू आणि तांदळापेक्षा भारत दुधाचे उत्पादन अधिक करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. बनासकांठा जिल्ह्यात दियोदार येथे ६०० कोटी खर्चातून साकारलेले नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बटाटा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भारतात वार्षिक साडे आठ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन होते आणि हे प्रमाण गहू आणि तांदळाच्या उलाढालीपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले.

बनास डेअरी प्रकल्पाच्या उदघाटनाला लाखो महिलांनी हजेरी लावली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की बनास डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि पशुपालन करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले मूल्य मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डेअरी योग्य दिशेने काम करत आहे. कालांतराने बनासकांठा जिल्ह्यातील माता-भगिनीच्या आयुष्यात बदल होईल. आपल्या मेहनतीमुळेच बनास डेअरी सोमनाथांच्या भूमीतून जगन्नाथांच्या भूमिपर्यत पोचत आहे. या डेअरीने कोरोनासारख्या कठिण काळातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यावेळी पंतप्रधानांनी जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी तलाव बांधण्याचे आवाहन केले . बनासकांठातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी किमान ७५ तलाव बांधण्याचे लक्ष्य ठेवावे, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश, हरियाना, ओडिशा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि झारखंड यासारख्या राज्यांतील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी बनास डेअरीने आपली कार्यकक्षा वाढविली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. भारत हा जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादक देश आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी या व्यवसायावर अवलंबून आहेत.

८० टन लोणी अन् एक लाख लिटर आइस्क्रीम

६०० कोटी रुपये खर्चून बनास डेअरीचे नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बटाटा प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे. बनास डेअरीत सुमारे ३० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. तसेच ८० टन लोणी, एक लाख लिटर आईस्क्रीम, वीस टन खवा, ६ टन चॉकलेट तयार करण्याचीही क्षमता असेल. बटाटा पुनप्रर्क्रिया केंद्रात फ्रेंच फ्राईज, चिप्स, आलू टिक्की, पॅटिस तयार केले जाणार असून या पदार्थाची अन्य देशांत त्याची निर्णय केली जाणार आहे.

Web Title: More Milk Production Wheat Rice Dedication Banas Dairy Prime Minister Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top