बेरोजगारांमध्ये पडणार 2 लाखांची भर

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्व देशांचे सामुहिक प्रयत्न आणि सार्वजनिक गुंतवणूकीत वाढ झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला प्रेरणा मिळुन जागतिक बेरोजगारीचा दर 2018 पर्यंत 2 दशलक्ष ने कमी होऊ शकतो असेही या अहवालात नमुद केले आहे.

नवी दिल्ली - देशातील बेरोजगारांची संख्या यावर्षी एक लाखांनी वाढण्याची शक्यता असून, पुढीलवर्षी (2018) त्यात आणखी दोन लाखांची भर पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक कामगार संघटनेने वर्तवली आहे. मात्र, एकुण बेरोजगारीचा दर मात्र 3.5 टक्क्यांवरुन यावर्षी 3.4 टक्क्यांवर येईल, असेही भाकित संस्थेने वर्तविले आहे. 

जागतिक कामगार संघटनेने 'जागतिक रोजगार आणि सामाजिक आढावा' शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे, की देशात 2016 मध्ये बेरोजगारांचा आकडा 17.7 दशलक्ष इतका होता. पुढीलवर्षी 2018 पर्यंत हा आकडा 18 दशलक्ष इतका वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, जगभरात बेरोजगारांच्या संख्येत 2017 मध्ये 34 लाखांची वाढ होईल. याशिवाय, उपलब्ध रोजगार आणि बेरोजगार व्यक्तींच्या आकड्यातील तफावत वाढणार असून जागतिक बेरोजगारीचा दर 5.7 टक्क्यांवरुन 5.8 टक्क्यांवर जाऊ शकतो. 

"आर्थिक वाढीची परिस्थिती निराशाजनक असून पुरेसे रोजगार निर्माण झाले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचे चिंताजनक चित्र उभे राहील", असे जागतिक कामगार संघटनेचे महासंचालक गाय रायडर म्हणाले. 

उदयोन्मुख देशांत दोनपैकी एका कामगाराचा रोजगार असुरक्षित आहे,तर विकसनशील देशांमध्ये ही स्थिती पाचपैकी चार असल्याची धक्कादायक माहिती जागतिक कामगार संघटनेतील वरिष्ठ अर्थतज्ञ व या अहवालाचे प्रमुख लेखक स्टीव्हन तोबीन यांनी दिली. भारताचा समावेश उदयोन्मुख देशांच्या यादीत केला आहे.

या अहवालानुसार, विकसनशील देशांत पुढील दोन वर्षात दिवसाला 3.10 डॉलरपेक्षा कमी मिळकत असणाऱ्यांच्या संख्येतही 5 दशलक्ष ने वाढ होण्याची शक्यता आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या स्थलांतर व सामाजिक अशांततेच्या घटनांमागे इतर कारणांसह जागतिक अनिश्चितता आणि चांगल्या रोजगाराचा अभाव ही कारणेही महत्त्वाची आहेत.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्व देशांचे सामुहिक प्रयत्न आणि सार्वजनिक गुंतवणूकीत वाढ झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला प्रेरणा मिळुन जागतिक बेरोजगारीचा दर 2018 पर्यंत 2 दशलक्ष ने कमी होऊ शकतो असेही या अहवालात नमुद केले आहे.

जगातील एकुण काम करणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के आशिया-पॅसिफिक भागातील आहेत. 2016 मध्ये त्यांच्या संख्येत 1.1 टक्क्याची (20 दशलक्ष) वाढ झाली आहे व 2017 मध्येही अशीच वाढ अपेक्षित आहे. याशिवाय, सध्या दक्षिण आशियात सर्वात जास्त रोजगार निर्माण झाले असून यापैकी बहुतांश रोजगार भारतात निर्माण झाले आहेत. याशिवाय, 2017 मध्ये अल्प रोजगार मिळणाऱ्यांच्या संख्येत घसरण होईल परंतु लोकसंख्या वाढीमुळे असुरक्षित रोजगाराचा दर कमी असूनही असुरक्षित रोजगाराच्या संख्येत माञ वाढ होऊ शकते, असेही संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Web Title: More people to be jobless in India: ILO