दहशतवादाच्या उदात्तीकरणामुळे युवकांची दिशाभूल : अहिर

पीटीआय
मंगळवार, 3 एप्रिल 2018

"सर्जिकल स्ट्राइक'नंतर दहशतवादी घटना वाढल्याचा आरोप चुकीचा असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. गेल्या सहा महिन्यांमध्ये 188 दहशतवादी मारले गेले असून, या काळात झालेल्या चकमकींमध्ये 56 जवान हुतात्मा, तर 10 नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली : जम्मू काश्‍मीरमधील युवकांची दिशाभूल करण्यासाठी दहशतवादी संघटना दहशतवादाचे उदात्तीकरण करत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत दिली. 

दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे जम्मू-काश्‍मीरला मोठा फटका बसत असून, या दहशतवादाला सीमेपलीकडून पाठिंबा आणि पाठबळही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू काश्‍मीरमधील परिस्थितीचा केंद्र सरकार सातत्याने आढावा घेत असून, येथील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित असल्याची माहितीही अहिर यांनी लोकसभा सदस्यांना दिली. "सर्जिकल स्ट्राइक'नंतर दहशतवादी घटना वाढल्याचा आरोप चुकीचा असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. गेल्या सहा महिन्यांमध्ये 188 दहशतवादी मारले गेले असून, या काळात झालेल्या चकमकींमध्ये 56 जवान हुतात्मा, तर 10 नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ला उधळून टाकताना दाखविलेल्या धाडसाबद्दल केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या चार जवानांना बढती दिल्याचेही अहिर यांनी सांगितले. धाडस दाखविल्याबद्दल बढती देण्याची ही गेल्या 14 वर्षांमधील पहिलीच घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: MoS Home Minister Hansraj Ahir thoughts about Terrorism