युती होणार नसेल, तर चांगले नाही; शिवसेना खासदाराची भावना 

Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल असलेली अस्पष्टता आणि दोन्ही बाजूंची त्यासाठी असलेली आतुरता याची झलक आज लोकसभेत दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "राखी भगिनी' असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घेत थेट मोदींकडेच "युती होणार नसेल, तर चांगले नाही,' अशा शब्दांत युतीसाठी शिष्टाई केली. 

लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषण पटलावर ठेवल्यानंतर लगेचच कामकाज तहकूब करण्यात आले होते. या वेळी हा मराठीतून संवाद रंगला. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांना पंतप्रधानांनी भेटण्याची प्रथा आहे. त्यानुसार 
पंतप्रधान मोदींनी सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांच्या आसनाजवळ जाऊन भेट घेतली. त्यात लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, रामविलास पासवान, कलराज मिश्रा, तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांचा समावेश होता.

यादरम्यान, पासवान यांच्या मागे चंद्रकांत खैरे आणि भावना गवळी हे शिवसेना खासदार उभे असताना पंतप्रधान मोदींनी भावना गवळींशी आवर्जून मराठीतून संवाद साधत विचारपूस केली. "काय भावना कसे काय,' असा प्रश्‍न मोदींनी विचारला; तर भावना गवळी यांनीही उत्तरादाखल, "छान' असे उत्तर दिले. मात्र, "युती (भाजप-शिवसेनेची) नसेल, तर चांगले नाही,' असेही त्यांनी पंतप्रधानांना ऐकवले. त्यांच्या या म्हणण्याला मोदींनी उत्तरादाखल प्रतिसाद दिला. या संवादामुळे अन्य उपस्थितांमध्ये खसखस पिकली. चंद्रकांत खैरे यांनी भावना गवळींच्या या म्हणण्यावर टाळी देऊन दाद दिली. 

वर्षभर चांगला मूड ठेवा! 
हसऱ्या चेहऱ्याने विरोधकांनी संवाद साधल्याबद्दल तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी मोदींना "वर्षभर असाच हसरा चेहरा ठेवा, नेहमी गंभीर राहू नका,' अशी मिस्किल टिप्पणी केली, तर मोदींनीही लगेचच "तुम्ही मंडळी आम्हाला तसे राहू देत नाहीत,' अशी परतफेड केली. सीबीआयसंदर्भातील बैठकीवरून मोदी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशीही मराठीतूनच बोलले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com