अंबाला कारागृहाच्या मातीपासून बनणार नथुराम गोडसेचा पुतळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाला कारागृहाच्या मातीपासून बनणार नथुराम गोडसेचा पुतळा

अंबाला कारागृहाच्या मातीपासून बनणार नथुराम गोडसेचा पुतळा

नवी दिल्ली: महात्मा गांधींच्या खूनातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसेला ज्याठिकाणी फाशी देण्यात आली त्या अंबाला कारागृहातील मातीपासून त्याचा पुतळा निर्माण करण्याचा संकल्प हिंदू महासभेने सोडला आहे. नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त 15 नोव्हेंबर म्हणजेच काल सोमवारी कार्यक्रम झाला. उत्तर प्रदेशामधील मेरठमधील बलीदान धाममध्ये गोडसे तसेच नारायण आपटे या गांधी हत्येतील दोन मुख्य आरोपींचे पुतळे बसविण्यात आले आहेत. असे बलीदान धाम प्रत्येक राज्यात उभारण्यात येईल, अशी माहिती हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी दिली आहे.

हेही वाचा: 'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

त्यांनी सांगितलंय की, महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल गोडसे आणि नारायण आपटे यांना १९४९ मध्ये अंबाला कारागृहात फाशी देण्यात आली होती. आम्ही तेथील माती गेल्याच आठवड्यात आणली आहे. त्या मातीपासून या दोघांचे पुतळे ग्वाल्हेरमधील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येतील.

हेही वाचा: 'राहुल गांधी ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?'

ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने २०१७ मध्ये ग्वाल्हेरच्या कार्यालयातील गोडसेचा अर्धपुतळा ताब्यात घेतला. तो अद्याप परत करण्यात आलेला नाही, असा दावाही डॉ. भारद्वाज यांनी केला. दरम्यान, ग्वाल्हेरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सत्येंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, हिंदू महासभेने सोमवारी कोणताही जाहीर कार्यक्रम घेतला नाही. आतापर्यंत कोणताही पुतळा बसविण्यात आलेला नाही. संघटनेच्या हालचालींवर पोलिस लक्ष ठेवतील. याच वर्षीच्या सुरुवातीला तरुणांना गोडसेचे विचार समजावेत म्हणून हिंदू महासभेकडून वाचनालय सुरु करण्यात आलं होतं. मात्र, जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत दोनच दिवसांत ते गुंडाळून टाकलं होतं.

loading image
go to top