‘कुनो’ मध्ये चित्त्यांपुढे बिबट्याचे आव्हान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Kuno National Park

‘कुनो’ मध्ये चित्त्यांपुढे बिबट्याचे आव्हान?

भोपाळ : नामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांना ५० पेक्षा अधिक दिवस पूर्ण झाले आहेत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे चित्ते आता रूळत असले तरी उद्यानात मोठ्या संख्येने असलेल्या बिबट्यांशी चित्ते कसे जुळवून घेणार याची वन्यजीवतज्ज्ञांना चिंता आहे. त्याचवेळी, या दोन्ही वन्यप्राण्यांच्या सहजीवनाचा इतिहास असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात १७ सप्टेंबर रोजी या आठ चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. तेव्हापासून चित्त्यांना उद्यानातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. आज त्यांनी तेथील वास्तव्याचे ५१ दिवस पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेत चित्त्यांच्या संख्येचे नियोजन करण्याचा अनुभव असलेले वन्यजीवसंवर्धनतज्ज्ञ व्हिन्सेंट व्हॅन डर मर्वे यांच्या मते कुनो राष्ट्रीय उद्यानात मोठ्या संख्येने असलेले बिबटे चित्त्यांसारख्या नवीन पाहुण्यांसाठी काळजीची बाब आहे.

मात्र, नामिबियासह दक्षिण आफ्रिका तसेच अगदी भारतातही चित्ते व बिबट्यांच्या सहजीवनाचाही इतिहास आहे, असा दिलासाही त्यांनी दिला. मर्वे यांच्यावर नामिबियातून १२ चित्ते भारतात आणण्याची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे, चित्त्यांच्या ३१ स्थानांतरण मोहिमां त्यांना अनुभव आहे. आफ्रिकेतील चित्त्यांच्या संख्येवर देखरेख ठेवण्याच्या प्रकल्पाचे ते व्यवस्थापन करतात.

चित्ते बिबट्यांना टाळतात. त्याचप्रमाणे, त्यांना पाठलाग करून पिटाळून लावतात. मात्र, चित्त्यांची पिले व पूर्ण वाढ न झालेले चित्ते बिबट्यांची शिकार होतात. दक्षिण आफ्रिकेत बिबट्यांनी जगातील सर्वांत वेगवान प्राणी असलेल्या चित्त्यांवर हल्ले केल्याची उदाहरणे आहेत. आफ्रिकेत नऊ टक्के चित्त्यांचे मृत्यू बिबट्यांमुळे झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी ‘पीटीआय’शी दूरध्वनीद्वारे बोलताना दिली.

चित्त्यांच्या लहान व मध्यम उद्यानातील संख्येवर देखरेख ठेवणाऱ्या गटाबद्दल ते म्हणाले, की हा खासगी गट चित्त्यांचे प्रजनन, त्यांची संख्या जास्त होणे किंवा चित्ते स्थानिक भागात नामशेष होण्यापासून रोखण्यासाठी समन्वय साधतो.

चित्त्यांची संख्या वाढण्याची गरज असलेल्या भागात स्थलांतर करण्यासाठी आवश्यक चित्ते हा गट ओळखतो. दक्षिण आफ्रिकेतील सरकार भारताला अतिरिक्त १२ चित्ते देण्याची परवानगी देईल, अशी आशाही त्यांना आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाचे संचालक उत्तम शर्मा म्हणाले, की उद्यानात ७० ते ८० बिबटे आहेत. चित्ता आपली शिकार सुरक्षित ठेवू शकत नाही. बिबट्या, तरस चित्त्याची शिकार खेचून आणतात.

७० ते ८० - कुनो उद्यानातील बिबट्यांची संख्या

३,४२१ - मध्य प्रदेशातील बिबटे

ही तर ‘ग्रेट न्यूज’ : मोदी

कुनोतील दोन चित्त्यांना विलगीकरण केंद्रांतून शनिवारी (ता.५) पाच चौ. कि.मी.च्या मोठ्या विभागात हलविल्याची माहिती उद्यानाचे विभागीय वनाधिकारी प्रकाश कुमार वर्मा यांनी दिली.

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील सर्व आठ चित्ते निरोगी, सक्रिय असून वातावरणाशी जुळवून घेत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून समाधान व्यक्त केले. या आठ चित्त्यांपैकी दोन चित्त्यांना विलगीकरणातून नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतंत्र विभागात सोडण्याची बातमी म्हणजे ‘ग्रेट न्यूज’ असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. उर्वरित चित्यांनाही लवकरच उद्यानाच्या वातावरणाची सवय होण्यासाठी अशा विभागात हलविले जाईल, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी ट्विटसोबत चित्त्यांचा व्हिडिओही शेअर केला.