दुर्गेची भूमिका साकारल्याने खासदार नुसरत जहाँ यांना जीवे मारण्याची धमकी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

अभिनेत्री तसेच तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

कोलकता- अभिनेत्री तसेच तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.
एका बंगाली चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या सध्या लंडनमध्ये गेल्या आहेत. त्यांनी नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी महिषासुरमर्दिनीची भूमिका केली होती. त्यांनी हातात त्रिशूळही घेतले होते. त्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली.

नुसरत यांना खासदार या नात्याने नेहमीसारखी सुरक्षा आहे. त्यांनी पश्चिम बंगाल सरकार तसेच परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. लंडनमध्ये आपण 16 ऑक्टोबरपर्यंत असू. तोपर्यंत आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयामार्फत पत्र पाठविले.

स्वरा भास्कर, गोहर खान, रिचाच्या शेलक्या प्रतिक्रियांनी नेटकरी संतापले

नुसरत यांनी यापूर्वी कुंकू लावले होते आणि इस्कॉन रथयात्रेचे उद्घाटन केले होते. त्यानंतरही त्यांना धमकी देण्यात आली होती. मानवतेच्या धर्मावर आपला विश्वास असून धर्मनिरपेक्षतेमुळे कोणत्याही धर्माच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यापासून मला रोखता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

सोशल मिडीयावरील पोस्टवर धमकी देणाऱ्या कमेंट पडल्या आहेत. त्यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळले आहे, असे नुसरत जहाँ यांनी म्हटले असून दोन मेलच्या स्क्रीनशॉट पत्राला जोडल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Nusrat Jahan Receives Death Threats After Posing As Goddess Durga