नांदेडच्या डॉक्टरने साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठवला 'लेटर बॉम्ब'; पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रल्हाद कांबळे
Sunday, 19 January 2020

नांदेडच्या देगलूर नाका येथील एका डॉक्टरला भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने शनिवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे

नांदेड : खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना लिफाफा बॉम्ब पाठवणाऱ्या नांदेडच्या देगलूर नाका येथील एका डॉक्टरला भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने शनिवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर २०१९ मध्येसुद्धा एक गुन्हा इतवारा पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस नांदेडमध्ये आले होते. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे आणि त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेऊन देगलूर नाका येथील दवाखान्यातून डॉ. सय्यद अब्दुल रहेमान महंमद उस्ताद रहेमान यास इतवारा येथे आणण्यात आले. त्याने काही दिवसांपूर्वी खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना एक संशयित लिफाफा पाठवला होता. त्यात आपला भाऊ आणि वडील- आई यांची नावे टाकून आयसीस, इंडियन मुजाहिद्दीन अशा दहशतवादी संघटनांचा उल्लेख केला होता. 

हेही वाचा(व्हिडीओ)- चक्क... अशोक चव्हाणांनी काढले होर्डींग्ज

भोपाळमध्ये गुन्हा दाखल

खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर भोपाळ पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३२६ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. भोपाळ येथील  दहशतवाद विरोधी पथक आणि नांदेडच्या इतवारा पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपल्या घरातील भांडण रस्त्यावर आणणाऱ्या डॉ. सय्यद अब्दुल रहेमान महंमद उस्ताद रहेमान याने केलेला खोटारडेपणा पोलिसांनी शोधला आणि त्यानेच लिफाफा बॉम्ब पाठवल्याची खात्री झाल्यानंतर भोपाळ एटीएस पथक डॉ. सय्यद अब्दुल रहेमान महंमद उस्ताद रहेमान यास सोबत घेऊन भोपाळला रवाना झाले आहेत.

लिफाफा बाँम्बमध्ये अँथ्रॅक्स पावडर 

लिफाफा बाँम्बमध्ये अँथ्रॅक्स नावाचे पावडरसुद्धा होते. ज्यामुळे लिफाफा उघडणाऱ्या माणसाला इजा होते आणि त्याचा मृत्यूपण होऊ शकतो. अँथ्रॅक्स हल्ला जगभर गाजलेला विषय आहे. डॉ. सय्यद अब्दुल रहेमानने पाठवलेल्या लिफाफ्यात तसे पावडर होते की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. पण त्या लिफाफ्यात आपले आई, वडील आणि भाऊ यांची नावे अनेक दहशतवादी पथकांसोबत जोडून खासदार प्रज्ञासिंह यांना धमकी दिली होती. त्यासंदर्भानेच भोपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढे आता कायदेशीर प्रवास भोपाळमध्ये सुरु झाला आहे. 

येथे क्लिक कराअभद्र वर्तन आले अंगलट, दोन वर्षाची शिक्षा

इतवारा पोलिस ठाण्यात आहे गुन्हा दाखल

सन २०१९ मध्ये इतवारा पोलीस ठाण्यात डॉ. सय्यद अब्दुल रहेमान महंमद उस्ताद रहेमान विरुद्ध गुन्हा क्रमांक २७५/१९ कलम ४२०, ४६८, ४७१ आयपीसी प्रमाणे दाखल झालेला आहे. त्यात त्याने आपल्या घराच्या वंश परंपरागत संपत्तीसाठी खोटी कागदपत्रे बनवल्याचा त्यावर आरोप होता.

त्यावेळी न्यायालयाने या डॉक्टरला काही दिवस पोलीस कोठडीत सुद्धा पाठवले होते. असो पण नांदेड शहरात दशतवादी संघटनांची नावे घेऊन जगण्याचा एक नवीन धंदा या प्रकरणामुळे समोर आला आहे. आपला कौटुंबिक बदला घेण्यासाठी सुद्धा त्या संघटनांचा वापर होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sadhvi detains nanded doctor who threatens who? Read the details