esakal | राम मंदिर जमीन घोटाळाप्रकरणी संजय सिंह यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Singh

राम मंदिर जमीन घोटाळा : संजय सिंहांचा कोर्टात जाण्याचा इशारा

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : राम मंदिर निर्मिती प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळाप्रकरण उघड करणारे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी आता हे प्रकरण कोर्टात घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. घोटाळा उघड केल्यानंतर तीन दिवसांनंतरही केंद्र सरकारनं याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे आपण आता कोर्टात जाण्याची तयारी सुरु केल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. (MP Sanjay Singh warns to go to court in Ram temple land scam case)

हेही वाचा: "मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर..."

संजय सिंह म्हणाले, "राम मंदिर निर्मितीतील घोटाळा उघड केल्यानंतर याप्रकरणी सरकारकडून कारवाई केली जाईल यासाठी तीन दिवस मी वाट पाहिली. पण आता मला हे कळालंय की भाजपचा भ्रष्टाचारी आणि खोट्या प्रॉपर्टी डिलर्सवर विश्वास आहे पण प्रभू रामावर नाही. त्यामुळेच आता मी हे प्रकरण कोर्टात घेऊन जाण्याची तयारी करत आहे."

काय आहे राम मंदिर जमीन घोटाळा?

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर निर्मिती प्रक्रियेत जमीन खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनुसार, राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीनं दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली. याची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. तर समाजवादी पार्टीचे नेते पवन पांडे यांनी आरोप केला की, "राम मंदिर उभारण्यात येत असलेल्या जागेच्या बाजूला लागून असलेली जमीन पुजारी हरीश पाठक यांनी १८ मार्च रोजी सुलतान अन्सारी आणि रवि मोहन या प्रॉपर्टी डिलर्सना २ कोटी रुपयांना विकली. त्यानंतर केवळ काही मिनिटांतच हीच जमीन चंपत राय यांनी राम मंदिर ट्रस्टच्यावतीनं १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली. यासाठी त्यांनी काही कागदपत्रेही पत्रकार परिषदेत मांडली. तसेच अवघ्या काही मिनिटांत दोन कोटींची जमीन १८ कोटींची कशी झाली? असा सवाल विचारत राम मंदिराच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चंपत राय यांचं आरोपांना उत्तर

दरम्यान, या जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्यावर अनेक वर्षांपासून असे आरोप होत आले आहेत. त्यामुळे आपण अशा आरोपांना भीक घालत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच ही जमीन ट्रस्टने बाजारभावापेक्षा खूपच कमी किंमतीला विकत घेतल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

loading image
go to top