खासदार म्हणतात, हेच घर हवंय! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

लोकसभेवर नव्याने निवडून आलेल्या खासदारांची सध्या राजधानीत भ्रमंती सुरू आहे ती दिल्ली किंवा आपापल्या पक्षाची मुख्यालये पाहण्यासाठी नव्हे; तर आपल्या पसंतीचे निवासस्थान मिळावे यासाठी!

नवी दिल्ली ः लोकसभेवर नव्याने निवडून आलेल्या खासदारांची सध्या राजधानीत भ्रमंती सुरू आहे ती दिल्ली किंवा आपापल्या पक्षाची मुख्यालये पाहण्यासाठी नव्हे; तर आपल्या पसंतीचे निवासस्थान मिळावे यासाठी! सध्या सुमारे अडीचशे खासदारांची निवासव्यवस्था जनपथावरील वेस्टर्न कोर्ट व राज्यांच्या सदनांमध्ये तात्पुरती करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत खासदारांना नवे फ्लॅट दिले जातील. लोकसभेची निवास समिती याबाबतचा निर्णय घेते. 

नवनिर्वाचित खासदारांना सामान्यतः साउथ-नॉर्थ ऍव्हेन्यू व विश्‍वंभरदास रस्त्यावरील बहुमजली इमारतींमधील आलिशान फ्लॅट दिले जातात. टाईप-5 (ए-ए, ए-बी व बी-बी) ही निवासस्थाने नव्या खासदारांना दिली जातात. ज्या खासदारांचा कार्यकाळ संपला आहे त्यांना 24 मेपासून महिनाभरात निवासस्थाने रिकामी करून देण्याच्या सूचना आहेत. आजारपण वा इतर अत्यावश्‍यक कारणांसाठी लोकसभाध्यक्षांच्या विशेष परवानगीने हा कालावधी चार महिन्यांपर्यंत वाढवून मिळतो. मात्र मोदी सरकार निवासस्थाने रिकामी करण्याबाबत सक्त भूमिका घेते, असा 2014 चा अनुभव आहे.

ल्यूटन्स दिल्लीत खासदार व मंत्र्यांसाठी पाच, सहा, सात व आठ प्रकारची 517 निवासस्थाने आहेत. यात 159 लहान-मोठे बंगले, 37 ट्विन फ्लॅट, 193 एकल फ्लॅट व बहुमजली इमारतींतील 96 फ्लॅट्‌सचा समावेश आहे. बहुतेक सर्व नव्या खासदारांनी आपापल्या पसंतीचे निवासस्थान लिहून ते अर्ज लोकसभेकडे जमा केले आहेत. निवासस्थानांबाबत अनेक खासदारांच्या विशेष अपेक्षा असतात. त्यांचा दिल्लीत प्रत्यक्ष मुक्कामी राहण्याचा कालावधी जास्तीत जास्त 190 दिवस असला तरी बरेच खासदार फ्लॅट मिळण्याबाबत फार चोखंदळ असतात, असा पूर्वानुभव आहे. साहजिकच, सध्या अनेक नवीन खासदार दिल्लीत राहणाऱ्या आपापल्या राज्यांतील सरकारी बाबूंच्या मदतीने ल्यूटन्स दिल्लीच्या चकरा मारून पाहणी करत आहेत. 

'सीपीडब्ल्यूडी'ला डोकेदुखी 
खासदारांनी रिकामी केलेली निवासस्थाने डागडुजी व रंगरंगोटीसाठी नंतर केंद्रीय लोकनिर्माण विभाग (सीपीडब्ल्यूडी) ताब्यात घेतो व नंतर ती नवीन खासदारांना दिली जातात. हे डोकेदुखीचे काम असल्याचा "सीपीडब्ल्यूडी'चा अनुभव आहे. अनेक खासदार निवासस्थाने रिकामी करताना त्यात सरकारच्या मालकीच्या वस्तूही सर्रास बरोबर नेतात.

महाराष्ट्रातील एका बहाद्दराने तर 2014 मध्ये दिल्लीतील निवासस्थानाच्या स्वच्छतागृहातील वस्तू व टाईल्सही सोडल्या नव्हत्या! या पार्श्‍वभूमीवर नवीन खासदारांना निवासस्थाने मिळेपर्यंत किमान दोन ते तीन महिने लागतील. त्यात पहिले अधिवेशन संपलेले असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP wishesh to elect the house in Delhi