उत्तर प्रदेशात इतिहासाची पुनरावृत्ती होईल-अखिलेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

या रथ यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा रथ यात्रा सुरु करण्याची संधी मला मिळत आहे

लखनौ - प्रत्येक धर्माला जोडण्याचे काम समाजवादी पक्षाने (सप) केले आहे. उत्तर प्रदेशातील नागरिक इतिहासाची पुनरावृत्ती करतील, अशी आशा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बहुप्रतिक्षित "विकास रथयात्रे'ला आजपासून (गुरुवार) सुरवात झाली. या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल यादव उपस्थित होते. या रथ यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा रथ यात्रा सुरु करण्याची संधी मला मिळत आहे, असे अखिलेश यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम दोन दिवसांनी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या यात्रेसाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते. त्यांची उपस्थिती समाजवादी पक्षाची सध्याची सारी स्थिती स्पष्ट करत होती. गेल्या काही दिवसांत यादव कुटंबातील कलहामुळे समाजवादी पक्षातील सारे राजकारण ढवळून निघाले होते. आता सर्वजण एकत्र आल्याचे दिसून आले. यात्रेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये किमान पाच हजार जीप आणि ट्रक सहभागी होतील, असे बोलले जाते. लखनौ ते उनाऊ या साठ किलोमीटरच्या यात्रामार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.

Web Title: Mulayam Singh and Shivpal arrive at Akhilesh Yadavs rath yatra venue in Lucknow