पुत्रवर्चस्वापुढे नेताजी "मुलायम' 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षातील आघाडीबाबत मुलायमसिंह यादव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खुद्द त्यांची गोची झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरवातीस या आघाडीला विरोध करणाऱ्या मुलायम यांनी नंतर यू-टर्न घेत तिचे समर्थन केले. एकीकडे शिवपाल यांनी दुसरा पक्ष स्थापन करण्याची केलेली घोषणा आणि मुलायम यांची माघार, या दोन्ही घटनांचा प्रत्येक जण आपापल्या परीने अन्वयार्थ लावतो आहे; पण पुत्रवर्चस्वासमोर आता तरी नेताजी "मुलायम' झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लखनौ: कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षातील आघाडीबाबत मुलायमसिंह यादव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खुद्द त्यांची गोची झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरवातीस या आघाडीला विरोध करणाऱ्या मुलायम यांनी नंतर यू-टर्न घेत तिचे समर्थन केले. एकीकडे शिवपाल यांनी दुसरा पक्ष स्थापन करण्याची केलेली घोषणा आणि मुलायम यांची माघार, या दोन्ही घटनांचा प्रत्येक जण आपापल्या परीने अन्वयार्थ लावतो आहे; पण पुत्रवर्चस्वासमोर आता तरी नेताजी "मुलायम' झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विशेष म्हणजे मुलायम यांच्या भूमिकेचे कार्यकर्त्यांनाही फारसे अप्रुप राहिलेले दिसत नाही; कारण, त्यांनी अखिलेश यांचा प्रचार करण्याची घोषणा दिल्लीमध्ये केल्यानंतर लखनौमध्ये कार्यकर्त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही केवळ अखिलेश भैयाच्या प्रचारामध्ये व्यग्र आहोत, आता आम्हास काम करणारा नेता आणि चेहरा मिळाल्याचे "सप' नेते सुनीलसिंह यादव यांनी सांगितले. 

मुलायम यांनी दहा दिवसांपूर्वी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आपण समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात असल्याचे जाहीर केले होते. नेमक्‍या त्याच दिवशी राहुल गांधी आणि अखिलेश यांचा रोड शो झाला होता. या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत एकीने निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मुलायम यांनी 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा यू-टर्न घेताना आपण प्रथम शिवपाल यांचा प्रचार करू आणि वेळ मिळाल्यास अखिलेशच्या प्रचारात जाऊ, असे सांगितले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी मुलायम यांनी समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस आघाडीसाठी आपण प्रचार करू, असे जाहीर केले होते. 

कारण काय? 
मुलायम यांनी यू-टर्न घेण्यामागे विविध कारणे असल्याचे बोलले जात असले तरी, अखिलेश आता स्वयंभू नेते झाल्यानेच नेताजी नरमले आहेत. अखिलेश यांचा वारू आता कोणीही रोखू शकणार नाही, हे त्यांना समजले आहे. त्यामुळेच त्यांनी माघार घेत आघाडीच्या पाठीशी आपले बळ उभे केले आहे. यामुळे शिवपाल यांचे राजकीय भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे. 
 

Web Title: Mulayam singh Yadav accepts Akhilesh as CM