मुस्लिमांबद्दल बोलण्याची विरोधकांना धास्ती

मुलायमसिंह यादव यांच्यापश्चात आता मुस्लिमांबद्दल कोण बोलणार?
Mulayam Singh Yadav
Mulayam Singh Yadav

मुलायमसिंह यादव यांच्यापश्चात आता मुस्लिमांबद्दल कोण बोलणार? या प्रश्नाचे उत्तर कुणीही नाही असे आहे. भाजपच्या विरोधकांना मुस्लिमांची मते हवी आहेत पण मुस्लिमांचा नेता असा शिक्का त्यांना नको आहे. या आठवड्याचा स्तंभ हा मुलायमसिंह यादव यांच्यावरील श्रद्धांजलीपर लेख नाही. मात्र १९९० पासून भारतातील मुस्लिमांचा आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे. त्यांच्या निधनामुळे मुस्लिमांच्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली.

कारण फाळणीनंतर भारतीय मुस्लिमांचे नेतृत्व प्रामुख्याने हिंदू नेत्यांनीच केले आहे. दुसरीकडे निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या गुजरातमधील खेडा जिल्ह्यात मुस्लिम युवकांना पोलिसांनी तालिबानी पद्धतीने फटके मारल्याची घटना घडली. मात्र, निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांकडून या घटनेचा फार आक्रमकपणे विरोध झालेला नाही.

मुस्लिम युवकांना मारहाणीची ही घटना टाळ्या पिटणाऱ्या हिंदू जमावापुढे घडली. त्याचे चित्रीकरण करण्यात येऊन व्हिडिओ व्हायरल केले. स्थानिक गरबा उत्सवावर दगडफेक केल्याचा या युवकांवर आरोप आहे. हा आरोप खरा आहे असे मानले तरीही घटनेनुसार चालणाऱ्या देशात कुणालाही शिक्षा देण्याची ही पद्धत नव्हे. सार्वजनिकरित्या फटके लगावणे हा काही हिंदू परंपरेचाही भाग नाही. त्यामुळे अत्याचाराचे हे चित्र वारंवार डोळ्यापुढे येत राहील. झिया-उल-हक यांनी ‘मार्शल लॉ’ लावल्यानंतर याच पद्धतीने झालेल्या मारहाणीचे चित्र वारंवार पुढे येते ते धर्मांधता किती भयानक असू शकते याची जाणीव करून देण्यासाठी.

युवा मुस्लिम विचारवंत असीम अली यांनी त्यांच्या स्तंभातून काही अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले आहेत. या मारहाणीला तालिबानी पद्धतीने मारहाण असे का म्हटले जात आहे? ही मारहाण हिंदुत्व पद्धतीने झाली असे म्हणायची लाज का वाटते? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. त्यावर अपेक्षेप्रमाणे हिंदू गटाकडून प्रतिक्रिया आली. मध्ययुगीनपूर्व हिंसक आणि कायदेकानून न मानणाऱ्या मुस्लिमांशी आम्हा हिंदूंची तुलना करण्याची कुणाची हिंमत कशी झाली, असे या प्रतिक्रेयेचे स्वरूप आहे. मग आपल्या सामाजिक, संविधानिक व नैतिक मूल्यांचे पतन होत असताना कोणतेही प्रश्न न विचारण्याचा दोष बहुसंख्याकांकडे जातो काय? या प्रश्नाचे उत्तर नाही असे देणे निरुपयोगी ठरणार असून त्याने मुस्लिमांची काहीही मदत होणार नाही.

खेडा घटनेवर चिडीचूप

केजरीवाल यांच्या ‘आप’ने गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबमधील विजयानंतर या पक्षाने पंतप्रधानांच्या गृहराज्यात डेरा टाकला आहे. या पक्षाच्या कुण्या नेत्याने खेडा घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे वा पत्रकार परिषद घेतल्याचे वा ट्विट केल्याचे कुणाला दिसले काय? आवाज न उठविणाऱ्यांमध्ये केवळ ‘आप’चाच समावेश नाही. ‘आप’चे उदाहरण यासाठी दिले की या पक्षाचे नेते भाजपच्या विरोधात नेहमी बोलत असतात. २०१७ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये चमत्कार घडविण्याच्या उंबरठ्यावर असलेला काँग्रेस पक्षही या मुद्द्यावर चिडीचूप आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत गुंतलेल्या या पक्षाचे सध्या गुजरातकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते.

कन्हैयाकुमार, मेवानी कोठे

भाजपने देशाचे विभाजन केले असल्याने त्यांच्याविरोधात ही ‘जोडो’ यात्रा असल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर काँग्रेसला गुजरातमधील हिंदू आणि मुस्लिमांना जोडायचे नाही काय? गुजरातमध्ये जिग्नेश मेवानी हा काँग्रेस पक्षाचा चेहरा आहे. आंदोलन करण्यासाठी तो ओळखला जातो. तोही खेडा येथे गेल्याचे दिसले नाही. जेएनयूमध्ये प्रत्येक आठवड्यात आपल्या भाषणाने क्रांती आणणारा कन्हैय्याकुमार यात्रेमधील फोटो आणि व्हिडिओ टाकत आहे. पण गुजरात, खेडा ते कुठे आहे? हसतमुख राहुल गांधी यात्रेदरम्यान आबालवृद्धांना ‘झप्पी’ देणाऱ्या राहुल गांधी यांना खेडा घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना मिठी मारून धीर देण्यास वेळ नाही.

चिदंबरम, मेवानी, केसीआर यांचा मुलगा केटीआर यांनी ट्विट वा घटनेचा ओझरता उल्लेख केला आहे. ममता यांच्या तृणमूलने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे घटनेची तक्रार केली आहे. तर ‘आप’च्या एका प्रमुख नेत्याने गुजरातमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तरप्रदेश व बिहारपेक्षा भयानक असल्याचे सांगताना या घटनेला फारसे महत्त्व दिले नाही.

नेतृत्वाची पोकळी व्यापक

आपल्याकडे मुस्लिमांचे मित्र (पर्यायाने हिंदू विरोधी) म्हणून बघितले जाईल, या भीतीपोटी भाजपचे विरोधक मुस्लिमांबद्दल बोलायला घाबरत आहेत. आपल्याला मुस्लिमांबद्दल बोलायची काही गरज नाही कारण भाजपच्या भीतीपोटी ते आपल्याकडे आपसूक वळतील असे त्यांना वाटते. शाहीनबाग येथील आंदोलन आणि त्यानंतर दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीमधून ‘आप’ने ज्या पद्धतीने अंग काढून घेतले त्यात याची प्रचिती येते. खेडातील घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ‘आप’ने नव्या राम मंदिराची तीर्थयात्रा काढण्याचे आश्वासन दिले.

देशातील २० कोटी मुस्लिम नेतृत्वाच्या अभावी सैरभैर असताना असे खेळ खेळणे धोकादायक आहे. धर्मनिरपेक्ष शक्ती दुर्लक्ष करत असल्याने नेतृत्वाची पोकळी मोठी होत असून त्याचा फायदा स्थानिक नेतृत्व घेत आहे. तसेच मुस्लिम लीग, ओवैसींचा पक्ष, पीएफआय व त्यांच्या समर्थकांनाही त्याचा फायदा होत आहे.

धोक्याचा पहिला संकेत

मोहम्मद अली जिना यांच्यानंतर भारतातील मुस्लिमांनी कुठल्याही मुस्लिम नेत्यावर विश्वास दाखवला नाही. कारण जिना यांनी केवळ देशाचीच फाळणी केली नाही तर मुस्लिम समुदायातही दुभंग निर्माण केला. त्यांनी वेगळ्या देशासाठी हट्ट धरला नसता तर आज एकसंध भारतात १८० कोटी लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची संख्या ६० कोटी एवढी असती. जिना यांनी उपखंडातील मुस्लिमांच्या शक्तीचे खच्चीकरण केल्यामुळेच मुस्लिमांनी काँग्रेस आणि नंतर गांधी घराण्याप्रति निष्ठा बाळगली. बाबरी मशीद पडल्यानंतर मुलायम आणि लालूप्रसाद यादव यांनी हिंदी पट्ट्यातील मुस्लिमांना आपले केले.

परंतु, हे दोन्ही नेते घराणेशाहीत गुंतल्याने त्यांचा राजकीय प्रभाव क्षीण होत गेला. धर्मनिरपेक्ष शक्ती आपली बाजू घेण्यास घाबरत आहे हे आता मुस्लिमांनाही दिसून येत आहे. नेतृत्वाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळेच कट्टरपंथी मुस्लिम शक्तींचे सध्या फावले आहे. ‘पीएफआय’चा प्रसार हा या धोक्याचा पहिला संकेत आहे.

अनुवादः किशोर जामकर

भारतासारख्या लोकशाही प्रजासत्ताकाला सध्या वेगवेगळ्या राजकीय आवाजांची गरज आहे. परंतु, आपल्याकडे मुस्लिमस्नेही म्हणून बघितले जाईल या भीतीपोटी भाजपचे विरोधक मुस्लिमांचा आवाज व्हायला घाबरत आहेत.

- राष्ट्रहिताच्या नजरेतून -शेखर गुप्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com