नागपूर, वाराणसीत सर्वंकष सुविधांची टर्मिनल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

जलवाहतूक ही सर्वांत मोठी प्रगतिशील व्यवस्था ठरल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, की बारा मोठ्या बंदरांच्या मालवाहतुकीत यंदा सहा हजार कोटी रुपये नफा झाला आहे व पुढच्या वर्षी तो सात हजार कोटींवर नेऊ. मुंबई-गोवा जलवाहतुकीसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुंबईत 100 व गोव्यात 60 वाहतूक करणारे क्रूझ खरेदी करण्यात आल्याचे ते म्हणाले.

 

नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील, असे टर्मिनल बांधण्याचे स्वप्न नागपूर आणि वाराणसीत साकारणार असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीची झळ बसणे तर सोडाच; पण पूर्वीइतक्‍याच वेगाने नवे रस्ते प्रकल्प सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

रस्ता वाहतुकीत अडथळे ठरणारे जुनाट ब्रिटिशकालीन नियम रद्द करून कालसुसंगत नियम आणि कायदे केले तरच भारतातील रस्ते वाहतूक व सामान्यांचा प्रवास सुरळीत व सुरक्षित होऊ शकेल व आपण तेच करत आहोत, असे निरीक्षण गडकरी यांनी नोंदवले. या वेळी देशातील किमान 30 टक्के वाहनचालकांचे परवानेच बनावट असल्याचे धक्कादायक वास्तवही त्यांनी सांगितले आणि रस्ते व महामार्ग ही "पार्किंग प्लेस' बनल्याचे ते म्हणाले. मुंबई-पुणे, रायपूर-अमरावती आदी दहा एक्‍स्प्रेस वेचे काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. प्रस्तावित मार्गांवर रस्तानिर्मितीला कचरा वापरणे, जलवाहतूक वाढवणे, शहरातील गोदामे बाहेर हलविणे, टोल नाक्‍यांवरच्या सुविधा तसेच इथेनॉल हेच मुख्य इंधन म्हणून 100 टक्के वापरायला प्रोत्साहन देणे, सर्व वाहनांची माहिती इलेक्‍ट्रॉनिक करणे आदी योजनांबाबतही ते बोलले.

मुंबई-बडोदा या 400 किलोमीटरच्या एक्‍स्प्रेस वेचे काम या वर्षी सुरू करणे, मुंबई-पुणे व नागपूर-रायपूर महामार्गांवर रस्ता सुरक्षेची माहिती देण्यासाठी एफएम रेडिओ केंद्रे सुरू करणे, महामार्गांवर ठिकठिकाणी पूल उभारणे आदी योजनांचीही माहिती गडकरी यांनी दिली. अडीच वर्षांत देशात आतापर्यंत चार लाख 60 हजार कोटींची कामे झाली असून, 14 हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशात 14 मोठे एक्‍स्प्रेस वे उभारण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्गावर रोड ओव्हरब्रिज (पूल) उभारण्यात येतील. महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये जवळपास 25 हजार रोड ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहेत. या कामी रेल्वे मंत्रालयाकडून 50 टक्के रक्कम मिळणार असून उर्वरित रक्कम भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय संबंधित राज्यांना देणार आहे. महामार्गांवरील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तिरुपती, केरळमधील देवस्थाने, शिर्डी, शेगाव, मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थानांसह इतरांनीही रुग्णवाहिका चालवाव्यात यासाठी मंत्रालयाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जलवाहतूक ही सर्वांत मोठी प्रगतिशील व्यवस्था ठरल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, की बारा मोठ्या बंदरांच्या मालवाहतुकीत यंदा सहा हजार कोटी रुपये नफा झाला आहे व पुढच्या वर्षी तो सात हजार कोटींवर नेऊ. मुंबई-गोवा जलवाहतुकीसाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुंबईत 100 व गोव्यात 60 वाहतूक करणारे क्रूझ खरेदी करण्यात आल्याचे ते म्हणाले.

राज्यसभेने अडविला जनहिताचा कायदा
राज्यसभेत सरकार अल्पमतात असल्याचा फायदा कॉंग्रेससह विरोधकांकडून वारंवार उठविला जातो, असा सरकारचा आरोप आहे. गडकरी यांनी सांगितले, की मोटार वाहन कायदा हा देशातील रस्ते वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने क्रांतिकारी ठरणार आहे. सरकार कायदा करण्यासाठी सज्ज आहे; पण राज्यसभेने हे विधेयक निवड समितीकडे पाठवायला भाग पाडले. हा दीड शतकापूर्वीचा कायदा लवकरात लवकर मंजूर होणे किती गरजेचे व जनतेच्याच आहे, हे माध्यमांनीच जनतेला सांगावे. या कामी मला तुमच्याकडून मदत हवी आहे अशी हतबलताही गडकरी यांनी व्यक्त केली.

विकासाच्या महामार्गावर...
14 हजार किलोमीटर - रस्तेबांधणीचे काम
14 एक्‍स्प्रेस वे बांधणार
25 हजार रोड ओव्हरब्रिज उभारणार

Web Title: Multi Modal Terminals in Varanasi and Nagpur