गांजाच्या सेवनात मुंबई आणि दिल्ली जगातील टॉप टेन शहरात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गांजाचे सेवन करणाऱ्या जगातील टॉप टेन शहरात दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरे आहेत. यात दिल्ली ३ नंबरला तर मुंबई ६ नंबर ला आहे.

सध्या ड्रग्ज कनेक्शनने बॉलीवू़ड चांगलेच हादरले आहे. या साऱ्या प्रकरणात दिपिका पदूकोणचे नाव समोर आल्याने यावरील चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र, भारतात हजारो वर्षांपासून गांजाचे सेवन केलं जात आहे. इतकंच नव्हे तर अथर्ववेदात पाच महान झाडांमध्ये गांजाचे नाव घेतलं गेलं आहे. त्याअर्थी हिंदू संस्कृतीचं आणि गांजाचं नातं तसं खूप जुने आहे. 

भारतात १९८५ च्या आधी गांजावर  कसल्याही प्रकारची बंदी नव्हती. मात्र, राजीव गांधींनी १९८५ मध्ये नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट, 1985 हा कायदा आणला आणि गांज्यावर भारतात कायद्याने बंदी आली. खरं तर अनेक देशात याच्या सेवनाला कायद्याने मान्यता आहे. काही देशात फक्त मेडिकल युजसाठी म्हणून गांज्याला मान्यता दिलेली आहे. मात्र बहुतांश देशात यावर कायद्याने बंदीचं आहे.

गांजाबद्दल थोडंसं...

खरं तर याच्या वापराला कायद्याने मान्यता मिळावी, अशीही मागणी सातत्याने होताना दिसते. गांज्याला मेरुआना, स्टफ, विड, माल अशाही नावांनी ओळखलं जात. कॅनेबीस असं याचं  शास्त्रीय नाव आहे. याच्या अनेक जाती आहेत. मात्र त्यातील कॅनेबीस सटाईव्हा आणि कॅनेबीस इंडिका या दोन प्रकारच्या जाती या सर्वात प्रसिद्ध आहेत. यापासून तीन प्रकारचे नशेचे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. गांजा, भांग आणि चरस. 
याचे अनेक दुष्परिणाम असल्याने यावर बंदी घातली गेली आहे. 
कमी वयात गांज्याचे सेवन केल्याने त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होऊ शकतो. २० वर्षाखालील मुलांना याचं व्यसन लागलं तर मुलांच्या आकलन क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. ज्यांना श्वसनाचे  आजार आहेत, जे आधीच मानसिक रोगी आहेत आणि ज्या महिला गर्भवती आहेत, त्यांच्यावर याचा विपरीत परिणाम हा होतोच होतो.

हेही वाचा - ड्रग्स चॅट प्रकरणात NCB ने दीपिकाची मॅनेजर करिश्माला समन्स बजावल्यानंतर आता दीपिकाचीही चौकशी होण्याची शक्यता

चिंतेत आहे, डिप्रेशनमध्ये आहे, दुःखी आहे म्हणून जरा बरं वाटावं, हलकं वाटावं म्हणून याचं सेवन केलं जातं. आणि मग याचं व्यसन लागतं. जे सुटणे कठीण होऊन बसतं. मात्र, आधीच बिघडलेल्या अथवा बिघडणाऱ्या मानसिक स्वास्थ्याला गांजा हा आणखी बिघडवू शकतो. इतकं की गमावलेलं मानसिक स्वास्थ्य हे परत मिळवणंही कठीण होऊन बसेल.

भारतात काय परिस्थिती...?

याला कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी भारतातही गेल्या वर्षांपासून जोर धरताना दिसत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गांज्याचे सेवन करणाऱ्या जगातील टॉप टेन शहरात दिल्ली आणि मुंबई हि दोन शहरे आहेत. यात दिल्ली ३ नंबरला तर मुंबई ६ नंबर ला आहे. याचा अर्थ असा आहे  की बंदी असूनही भारतात याची विक्री आणि सेवन हे सर्रास सुरूच आहे. उलट, हे बेकायदेशीर असल्याने छुप्या पद्धतीनेच, याची एकूण निर्मिती, प्रसार, खरेदी-विक्री आणि सेवन होत आहे. त्यामुळे लोकांना हे कळतच नाहीय कि आपण कोणत्या प्रकारचा गांजा हा आपल्या शरीरात ढकलत आहोत. ज्या देशात गांजा कायदेशीर आहे, तिथे त्याच्यामध्ये असणाऱ्या नशेच्या घटकांची मात्रा लिहलेली असते जेणेकरून त्याची माहिती ही घेणाऱ्याला कळावी.

हेही वाचा- 'व्हॉईसरॉय मोदी' म्हणत सोनिया गांधीचा मोदी सरकारवर निशाणा

भारतात जवळपास अडीच करोडहून अधिक लोक गांज्यासारख्या नशेच्या पदार्थांचे सेवन करतात. आणि ६० लाखाहून अधिक लोक याच्या वापराने होणाऱ्या दुष्परिणामांना बळी पडतात. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यात या पदार्थांचे सर्वाधिक सेवन केलं जातं. मात्र कुंभमेळ्यामध्ये टनावारी गांजाला सेवनासाठी परवानगी दिली जाते. 

तुम्ही गांजासोबत पकडला गेला तर काय होईल...?

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट, 1985 ऍक्टनुसार गांजाचं सेवन करणं हा गुन्हा आहे. किती प्रमाणात याचं सेवन केलं गेलं आहे यावरून शिक्षेचं प्रमाणही ठरतं. जर एखाद्या व्यक्तीने स्वइच्छेने या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपचार घेण्याचा पर्याय निवडला तर त्याच्यावर कारवाई केली जात नाही. 

तुमच्याकडे किती प्रमाणात गांजा आहे यानुसार कमीतकमी 6 महिन्यांपर्यंत ते जास्तीतजास्त 20 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. सोबतच कमीतकमी 10 हजार ते 2 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. गांजा सोबत बाळगला, त्याची खरेदी-विक्री केली, वाहतूक केली तर या कायद्याच्या 20 व्या सेक्शननुसार हा गुन्हा ठरतो. जर तुम्ही आपली जागा याचा साठा करण्यास अथवा सेवन करणाऱ्यांसाठी दिलीत तर तुम्हीही सेक्शन 20 नुसार समान गुन्हेगार ठरता. त्यामुळे थोडादेखील गांजा बाळगण्याचा अथवा सेवन करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर या साऱ्या गोष्टी लक्षात घ्या की आपण एक बेकायदेशीर कृत्य करत आहात. सोबतच स्वत:चे शरीरदेखील धोक्यात घालत आहात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai & Delhi In Top Ten Cities in Drugs Consumption