पत्रकार जे. डे. हत्याकांडचा निकाल 2 मे ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

जे. डे. यांची हत्या छोटा राजन याच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश आगावणे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक केली होती.

मुंबई - जेष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे हत्याकांड खटल्याचा निकाल 2 मे ला देणार असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले आहे. जे. डे हत्या खटल्याची सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. 11 जून 2011 ला जे. डे. यांच्यावर दुचाकीवरुन घरी जात असताना पवई येथे पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी झालेले डे यांना हिरानंदानी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा मृत्यु झाला. जे. डे यांनी गुन्हेगारी जगतावर पुस्तकं लिहिली होती, यामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याने त्यांना ठार केले, असा दावा करणारे आरोपपत्र सीबीआयने विशेष न्यायालयात सादर केले होते.

ही हत्या छोटा राजन याच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश आगावणे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. या आरोपींपैकी सतीश, अनिल, अभिजीत, नीलेश, अरुण, मंगेश, सचिन यांचा डे यांच्या हत्येत थेट सहभाग होता. मुंबई गुन्हे शाखेने प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यावरुन डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजन याच्या इशाऱ्यावरून घडल्याचे स्पष्ट केले. 

हत्येच्या काही काळानंतर आरोपी विनोद असरानी याचा आजारपणात मृत्यू झाला होता. याविषयी चौकशी करण्यासाठी राजनने चेंबूरच्या एका मित्राला फोन केला होता. ते संभाषण मुंबई गुन्हे शाखेने रेकॉर्ड केले होते. ज्यात डे यांची हत्या का केली याबद्दल बातचीत केली गेली होती. छोटा राजन याच्यावर महाराष्ट्रात सत्तर गुन्हे आहेत. मुंबई सत्र न्यायालय 2 मे ला अटकेत असलेल्या 11 आरोपींबाबत निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: Mumbai Session Court Will Announce Verdict Of J Dey Murder Case On 2 May