कॉमेडी करताना हिंदू देवतांसह अमित शहांचा अपमान, मुनव्वर फारुकीला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 January 2021

इंदौरच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी एका कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली- हिंदू देव-देवतांचा अपमान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी कॉमेडियन मुनव्वर फारुकीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. फारुकीसोबत आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरोधात भाजप आमदाराच्या मुलाने तक्रार दाखल केली होती. 

इंदौरच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी एका कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने आपला परफॉर्मंस दिला. या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण सिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड आपल्या मित्रांसोबत गेला होता.

दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले उत्तर

मुनव्वर फारुकी आपला परफॉर्मंस करताना हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह कॉमेडी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आक्षेपार्ह कॉमेडीमुळे एकलव्य सिंह गौड भडकले आणि त्यांनी याला विरोध केला. त्यानंतर प्रकरण वाढले आणि कार्यक्रमाला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

एकलव्य यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुजरातच्या जुनागडचे रहिवासी असणारे कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि चार स्थानिक लोकांविरोधात शुक्रवारी रात्री उशीरा तक्रार दाखल करुन घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केलं आहे. 

एकलव्य 'हिंदू रक्षक' नावाच्या स्थानिक संघटनेचे संयोजक आहेत. माध्यमातील काही बातम्यांनुसार कॅफेमधील गोंधळादरम्यान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुनव्वर फारुकीला मारहाण केली, पण एकलव्य यांनी आरोप फेटाळून लावला आहे.  

कोरोनात नोकरी गेल्यानंतर करायचा चोरी; मास्क काढला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

दरम्यान, फारुकीच्या अटकेनंतर ट्विटरवर चार्ली हेब्दो (charli hebdo) हॅशटॅग ट्रेंड होत आहे. चार्ली हॅब्दो या नियतकालीकामध्ये मोहम्मद पेंगंबराचे व्यगंचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर व्यंगचित्रकारासह अन्यांची हत्या करण्यात आली होती. तसेच याच प्रकरणावरुन फ्रान्समध्ये गेल्या वर्षी हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनेचा निषेध करत भारतातील अनेक उजव्या संघटनांनी इस्लाम धर्म व्यक्ती स्वातंत्र्याबाबत संकुचित असल्याची टीका केली होती. आता फारुकीने कथितपणे हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा कारणास्तव त्याला अटक करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावर 'ट्विटर वॉर' सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Munawar Faruqui comedian from arrested after alleges insult to Hindu deities and Home Minister Amit Shah