'...तर भरचौकात गोळ्या घाला, माफी मागणार नाही', पैगंबर प्रकरणी मुनव्वर राणांची प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 2 November 2020

उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचे म्हटले होते.

लखनऊ- उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटलं आहे. तसेच फ्रान्सच्या घटनेवर सत्य बोलण्यासाठी मला जी शिक्षा मिळेल ती मान्य असल्याचे ते म्हणाले आहेत. 

मी अन्य लोकांप्रमाणे नाही, जे आपल्यावरील खटला मागे घेत फिरतात आणि खरे बोलण्यास घाबरतात. जर माझ्या वक्तव्यावरुन काही गुन्हा सिद्ध झाला तर मला चौकात उभा करुन गोळ्या घाला, असं राणा म्हणाले आहेत. मला हवं तर जिहादी म्हणा, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी माफी मागणार नाही, हवंतर मला फाशी द्या, असंही ते म्हणाले आहेत.  त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पैगंबरांच्या कार्टूनप्रकरणी ओवैसींची प्रतिक्रिया; खूप त्रास झाला, पण...

धार्मिक भावना भडकवल्याचा राणा यांच्यावर आरोप आहे. लखनऊ येथील हजरतगंज कोतवाली येथे आयपीसीच्या अनेक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचे म्हटले होते. पैंगबर मोहम्मद यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणाऱ्याबरोबर असंच व्हायला हवे. जर कोणी आमच्या आईचे किंवा वडिलांचे व्यंगचित्र काढत असेल तर त्याला मारले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. 

मुनव्वर राणा यांनी एका वाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले होते. एमएफ हुसेन यांनी हिंदू देवी-देवतांचे वादग्रस्त पेंटिग्ज केले होते. त्यावेळी 90 वर्षीय वयोवृद्धास देश सोडून जावं लागलं होतं. पळून गेलो नाहीतर आपली हत्या केली जाईल, हे त्यांनी ओळखलं होतं. परदेशात त्यांचा मृत्यू झाला. जर भारतात हजारो वर्षांपासून ऑनर किलिंगला योग्य मानले जाते. त्यांना कोणतीच शिक्षा केली जात नाही. मग फ्रान्सच्या घटनेला बेकायदेशीर कसं म्हणता येईल, असे राणा म्हणाले. 

राणा पुढे म्हणाले की, आक्षेपार्ह व्यंगचित्र हे पैंगबर मोहम्मद आणि इस्लामला बदनाम करण्याच्या हेतूने केले जातात. अशा कृत्यांमुळेच लोक फ्रान्समधील घटनेप्रमाणे पावले उचलतात. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधताना फ्रान्सचे समर्थन करणेही चुकीचे असल्याचे म्हटले. राफेल करारामुळे मोदी असे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींनी फ्रान्समधील दहशतवादी घटनेचा निषेध करुन पीडित कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: munnawar rana said i stand with my comment France prophet cartoon