लाल किल्ल्यात नेताजींना समर्पित संग्रहालय

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. नेताजींच्या 122व्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. नेताजींच्या 122व्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

लाल किल्ल्यात झालेल्या समारंभात याद-ए-जालियानवाला संग्रहालय आणि दृश्‍यकला संग्रहालयाचेही मोदी यांच्या हस्ते या वेळी उद्‌घाटन करण्यात आले. या सर्व संग्रहालयांचा समावेश असलेल्या भागाला "क्रांती मंदिर' असे नाव देण्यात आले आहे. ""देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या धाडसी क्रांतिकारकांना श्रद्धांजली म्हणून संग्रहालयांच्या परिसराचे नामकरण "क्रांती मंदिर' असे करण्यात आले आहे,'' असे या कार्यक्रमानंतर मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. 

नेताजी बोस आणि त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला समर्पित संग्रहालयात या दोहोंशी संबंधित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नेताजींनी वापलेल्या तलवारीपासून, त्यांना मिळालेले मान-सन्मान, त्यांचे पोशाख, त्यांची लाकडी खूर्ची अशा अनेक वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत.

नेताजी आणि आझाद हिंद सेनेवरील एक माहितीपट येथे भेट देणाऱ्यांना पाहता येईल. या माहितीपटातून नेताजींच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे. या माहितीपटाला अभिनेता अभिषेक बच्चन यांनी आवाज दिला आहे. 

Web Title: The museum dedicated to Netaji in the Red Fort