राममंदिरासाठी विटा घेऊन मुस्लिम कारसेवक अयोध्येत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिर उभारणीस पाठिंबा दर्शवित मुस्लिम कारसेवक मंचाचे (एमकेएम) सदस्य "जय श्री राम'चा घोष करत ट्रकभर विटा घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत.

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिर उभारणीस पाठिंबा दर्शवित मुस्लिम कारसेवक मंचाचे (एमकेएम) सदस्य "जय श्री राम'चा घोष करत ट्रकभर विटा घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत.

गुरुवारी "जय श्री राम'चा घोष करत एमकेएमचे सदस्य अयोध्येत पोहोचले. त्यांनी राममंदिर उभारणीसाठी सोबत एक ट्रक भरून विटाही आणल्या आहेत. याबाबत बोलताना एमकेएमचे अध्यक्ष मोहम्मद आझम खान म्हणाले, "मी पठाण आहे. आमचे पूर्वज क्षत्रिय होते. मी दावा करतो की प्रभू रामचंद्रही क्षत्रिय होते. भारतीय मुस्लिमांचा राममंदिर उभारणीला पाठिंबा आहे. राममंदिर प्रेम, एकतेचा प्रसार करून लोकांच्या मनातील द्वेष दूर करेल.'

यापूर्वीही मुस्लिम कारसेवक संघाने (एमकेएस) या संघटनेने अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी बॅनर लावून पाठिंबा दर्शविला होता. अलिकडेच एमकेएसने उत्तर प्रदेशमधील फैझाबाद आणि लखनौ येथे मोठमोठे बॅनर्स लावून राममंदिर उभारणीस पाठिंबा दर्शविला आहे. आता एमकेएमनेही पाठिंबा दर्शविला आहे.

रामंमदिरासंदर्भातील प्रकरण न्यायालयाबाहेर परस्पर चर्चेने मिटवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच सुचविले होते. या सूचनेचे अनेकांनी स्वागत केले होते. तर काही मुस्लिम नेत्यांनी हा मुद्दा चर्चेने सुटला नाही म्हणून न्यायालयात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Web Title: Muslims Kar Sevaks arrive in Ayodhya with bricks for construction of Ram Temple