माझ्या वडिलांच्या निधनानंतर भाजपमधून विश्वास, वचनबद्धता संपली : उत्पल पर्रीकर

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने स्वीकारला दुसरा मार्ग. 

-  भाजपमधून आता विश्वास आणि वचनबद्धता यांसारखे शब्द संपले

नवी दिल्ली : माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने दुसरा मार्ग स्वीकारला. भाजपमधून आता विश्वास आणि वचनबद्धता यांसारखे शब्द संपले आहेत, अशी टीका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी केली. माझे वडील हयात असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता यांसारख्या शब्दांना महत्त्व होते. मात्र, आता या गोष्टी राहिल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांच्या भाजपमध्ये प्रवेशावरून उत्पल पर्रीकर पीटीआयशी बोलत होते. ते म्हणाले, "माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता यांसारख्या शब्दांना महत्त्व होते. ही पक्षाची मूल्ये होती. पण 17 मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. आता पक्षाने वेगळीच दिशा पकडली आहे. त्यामुळे काय योग्य हे वेळच सांगेल.

कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये : मुख्यमंत्री सावंत

काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये सहभागी होत असताना त्यांनी कोणतीही अट घातली नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Fathers Path Of Politics Ended On March 17 says Utpal Parrikar