नजीब जंग यांचा राजीनामा तूर्त नामंजूर 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दोन दिवसांपूर्वी नाट्यमयरीत्या दिलेला राजीनामा केंद्र सरकारने तूर्तास मंजूर केलेला नाही. सध्या पदावर कायम राहण्याची सूचना जंग यांना करण्यात आली आहे. यामुळे जंग यांना आपली प्रस्तावित सुटी व गोवा दौराही रहित करावा लागला आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दोन दिवसांपूर्वी नाट्यमयरीत्या दिलेला राजीनामा केंद्र सरकारने तूर्तास मंजूर केलेला नाही. सध्या पदावर कायम राहण्याची सूचना जंग यांना करण्यात आली आहे. यामुळे जंग यांना आपली प्रस्तावित सुटी व गोवा दौराही रहित करावा लागला आहे. 

पदत्यागाची संपूर्ण मानसिक तयारी जंग यांनी केली आहे. मात्र, भाजप सूत्रांच्या माहितीवर विश्‍वास ठेवायचा तर पुढच्या वर्षी; विशषेतः भारताच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदावारांचे चित्र स्पष्ट होत नाही तोवर जंग यांना कार्यमुक्त करण्यास सरकार व गृहमंत्रालयही अनिच्छुक दिसत आहे. जंग यांनी यानंतरही आग्रह धरला तर पुढच्या महिन्यात त्यांच्या जागी नवी नियुक्ती केली जाऊ शकते. 

राजीनामा नामंजूर झाल्यावर जंग आज दुपारपासून पुन्हा नायब राज्यपालांच्या कचेरीत दाखल झाल्याचे वृत्त आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी सौदार्हाचे संबंध असलेल जंग यांनी पदाचा अचानकपणे राजीनामा दिल्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यांचा कार्यकाळ अद्याप दीड वर्षे बाकी असतानाच त्यांनी पद सोडल्याने चर्चा वेगवान झाली होती. दिल्लीतील सत्तारूढ "आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी जंग यांच्याशी उभा दावा मांडला होता. केजरीवाल यांनी "आप' सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जंग यांना कॉंग्रेसचे तर दुसऱ्या कार्यकाळात भाजपचे; त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्तक ठरविले होते. केजरीवाल यांच्या सततच्या व बेफाम आरोपांमुळे जंग गेले काही महिने विलक्षण व्यथित झाल्याचे सांगितले जात होते. जंग यांच्या गुरुवारी सादर झालेल्या राजीनाम्यानंतर केजरीवाल यांनी आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसला अशी प्रतिक्रिया दिली होती. जंग यांना शुगलू समितीचा अहवाल जाहीर करण्यापासून सरकार व "आप'ने रोखल्याचा ठपका कॉंग्रेसने ठेवला होता. जंग यांनी भाजप व त्यातही संघाशी काडीमात्र संबंध न ठेवणे हेही त्यांच्या निर्णयामागील कारण सांगितले जात होते. 

प्रस्तावित गोवा दौरा रद्द 
जंग यांनी काल (शुक्रवार) पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्या वेळीही त्यांनी, आपण पुन्हा आवडीच्या शिक्षण क्षेत्राकडे वळणार असल्याचे पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचे समजते. याच भेटीत मोदी यांनी त्यांना तूर्त तुम्हीच पदावर रहावे अशी आपली अपेक्षा आहे असे सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर "पीएमओ'मधून आज दुपारी जंग यांचा राजीनामा सध्या मंजूर करण्यात आलेला नाही असे सांगण्यात आले. यानंतर जंग यांनी 25 डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यानचा आपला प्रस्तावित गोवा दौराही रद्द केला आहे. ते यापुढेही काम करत रहातील असे दिल्ली राजनिवासातून लगेचच स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Najeeb Jung advised to stay as LG of Delhi