तुरुंगवारी केलेल्या नेत्यांमध्ये 'या' नावाची भर... 

Name of P chidambaram add in arrested politicians
Name of P chidambaram add in arrested politicians

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री, राज्यसभेचे विद्यमान खासदार पी. चिदंबरम (वय 73) यांना सीबीआयने काल (ता. 21) अटक केल्याने तुरुंगवारी घडलेल्या हाय प्रोफाइल नेत्यांच्या यादीत चिदंबरम यांचे नाव समाविष्ट झाले आहे. विविध आरोपांवरून तुरुंगात गेलेल्या बड्या नेत्यांची ही यादी : 

- लालूप्रसाद यादव : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी रेल्वेमंत्री. 900 कोटी रुपयांच्या चारा गैरव्यवहारातील तीन प्रकरणांमध्ये दोषी सिद्ध. सध्या रांची येथील तुरुंगात. 
- जे. जयललिता : अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री. 1991 ते 1996 या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी 1996 मध्ये अटक. 2014 मध्ये पुन्हा एकदा तुरुंगवास. (डिसेंबर 2016 मध्ये निधन) 
- बंगारु लक्ष्मण : भाजपचे माजी अध्यक्ष, माजी रेल्वे राज्यमंत्री. शस्त्र करारात लाच घेतल्याप्रकरणी 2012 मध्ये चार वर्षांची शिक्षा. (2014 मध्ये निधन) 
- ए. राजा : द्रमुक पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री. टू-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारप्रकरणी 2011 मध्ये अटक, नंतर सव्वा वर्षानंतर जामिनावर बाहेर. 
- कनिमोळी : द्रमुकचे दिवंगत अध्यक्ष एम. करुणानिधी यांची कन्या, विद्यमान खासदार. टू-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारप्रकरणी आरोप झाल्यानंतर 2011 मध्ये सहा महिने तुरुंगवास. 
- बी. एस. येडियुरप्पा : कर्नाटकमधील भाजपचे वरिष्ठ नेते, विद्यमान मुख्यमंत्री. सरकारी जमिनीवरील आरक्षण उठविण्यात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर लोकायुक्त न्यायालयाकडून ऑक्‍टोबर 2011 मध्ये तुरुंगात रवानगी. 25 दिवस कोठडीत. 
- सुरेश कलमाडी : कॉंग्रेस नेते, माजी रेल्वे राज्यमंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रकुल स्पर्धा 2010 चे अध्यक्ष. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहारप्रकरणी सप्टेंबर 2011 मध्ये अटक. नऊ महिने तुरुंगवास. 
- अमरसिंह : समाजवादी पक्षाचे माजी नेते. कॅश फॉर व्होट प्रकरणात 2011 मध्ये 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 
- एस. पी. त्यागी : माजी हवाई दलप्रमुख. ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणात लाचखोरीच्या आरोपावरून डिसेंबर 2016 मध्ये अटक. 

चिदंबरम यांना अटक करण्याची पद्धत निराशाजनक आहे. लोकशाही आक्रोश करत असतानाही न्यायव्यवस्था मदतीला येत नसल्याचे दिसत आहे. 
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल 

सूडभावनेतून अटक : कार्ती 
नवी दिल्ली : पी. चिदंबरम यांना राजकीय सूडभावनेतून अटक करण्यात आली असून, "आयएनएक्‍स' मीडियावर प्रमुख पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी यांच्याबरोबर आमचे कोणतेही संबंध नाहीत, असा दावा चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. केवळ माझ्या वडिलांनाच नव्हे, तर कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले जात आहे. मी याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे, असेही कार्ती यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com