राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणे

राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

जयपूर : सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पडून मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येईल, असा मोठा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. जयपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना राणेंनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

राणे म्हणाले की, "महाराष्ट्रात लवकरात लवकर भाजपचे सरकार सत्तेत येईल. जो बदल तुम्हाला अपेक्षित आहे तो मार्च महिन्यापर्यंत दिसून येतील," याबाबत आता अधिक खोलात सांगता येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार स्थापन करायचे असेल तर काही गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात असे सूचक विधानही त्यांनी यावेळी नमूद केले. एकूणच त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून महाराष्ट्रात मार्च महिन्यात खरंच सत्तांतर होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: आता लोकाभिमुख कारभाराची गरज; केंद्रीय मंत्री नारायण राणे

राऊत, फडणवीसांनंतर पवार दिल्लीकडे रवाना

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. मागील चार दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी काल अमित शाहांची भेटही घेतली. आज देवेंद्र फडणवीस राजधानीत दाखल झाले. ते जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं समोर येतंय. सध्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बंद दाराआड तीन तासांपासून चर्चा सुरू आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्याने संजय राऊत दिल्लीत रवाना झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षांच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांनी नरेंद्र मोदींच्या संविधान कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली. यादरम्यान, आता शरद पवारांनीही दिल्लीसाठी कूच केलंय. मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी राजधानी गाठली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सतत अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांचा सुरू आहे. केंद्रातील सरकारचा त्याला पाठिंबा आहे. काहीही झालं तरी हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास नेते व्यक्त करतात. मात्र, अचानक वाढलेल्या घडामोडींनी राजकीय पटलावर अस्थिरता वाढली आहे. विरोधकांची बैठक असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज्यात विधानपरिषद निवडणुकांसाठी जागा उमेदवाऱ्या जाहीर झाल्या आहेत. त्यातच तीन-चार महिन्यांवर 6 मनपाच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर असताना ही राजकीय खलबतं सुरू झाल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.

loading image
go to top