दहशतवाद्यांना नेता बनवू नका - मोदी

दहशतवाद्यांना नेता बनवू नका - मोदी

नवी दिल्ली - दहशतवादी बुऱ्हाण वणी याला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात उद्भवलेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तातडीने आढावा बैठक घेतली. ताज्या घडामोडींवर चिंता व्यक्त करताना त्यांनी जम्मू-काश्‍मीर सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले आहे. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन करताना दहशतवाद्यांना नेता बनविण्याची गरज नाही, असे खडसावले आहे. 

आफ्रिकेच्या दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर मोदी यांनी मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतली. "7, रेसकोर्स मार्ग‘ या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरुण जेटली, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राजनाथसिंह यांनी राज्यातील घटनाक्रमाची तसेच गृहखात्याने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्‍मीरचा मुद्दा उकरून काढल्याची तसेच भारतीय उच्चायुक्तांना बोलावून जाब विचारल्याच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. 

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी प्रसारमाध्यमांना या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारला मदतीची ग्वाही दिली आहे. कोणत्याही निर्दोष व्यक्तीला तेथे प्राण गमवावे लागू नयेत. केंद्र सरकार काश्‍मीर खोऱ्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे या बैठकीत मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे अमरनाथ यात्रेच्या व्यवस्थेवर त्यांनी समाधान व्यक्त केले. 
यासोबतच, बैठकीबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी सुरक्षा दलांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचाही इशारा दिला आहे. बुऱ्हाण वणी हा दहशतवादी होता. त्याला नेता बनविण्याऐवजी त्याच्याकडे दहशतवादी म्हणूनच पाहिले जावे. राज्यातील मेहबूबा मुफ्ती सरकारने या परिस्थितीचा प्रभावीपणे मुकाबला करावा. मात्र, सुरक्षा यंत्रणांवर हल्ले झाल्यास कठोरपणे कारवाई केली जाईल, असेही मोदी यांनी बैठकीत सांगितल्याचे कळते. सुदानमधील चिंताजनक परिस्थिती आणि तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा व्यवस्था यावरही चर्चा झाली. 

वणी याला सुरक्षा यंत्रणांनी एका कारवाईदरम्यान ठार केल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार भडकला होता. संतप्त जमावाने केलेले हल्ले आणि सुरक्षा यंत्रणांची कारवाई यामध्ये आतापर्यंत 24 जण मृत्युमुखी पडले असून, 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

अमेरिका दौरा स्थगित 
मुस्लिम धर्मगुरूंचे शिष्टमंडळ राजनाथसिंह यांना आज भेटले. त्यांनी काश्‍मीरच्या मुद्द्यावर राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, या प्रकरणातील गांभीर्य पाहता राजनाथसिंह यांचा 17 जुलैपासून सुरू होणारा अमेरिका दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

तणावपूर्ण शांतता
 केंद्र अतिरिक्त लष्करी कुमक पाठविणार
 चकमकीतील मृतांची संख्या ३० वर
 सोनियांची उमर अब्दुल्लांशी दूरध्वनीवरून चर्चा
 कुपवाड्यातील हिंसाचारात एक ठार
 सोपोरमध्ये पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला
 पुलवामा जिल्ह्यातील रोमू येथे आंदोलकांनी पोलिस चौकी पेटविली
 त्रालमध्ये आंदोलकांचा सीआरपीएफच्या छावणीवर हल्ल्याचा प्रयत्न, १६ आंदोलक जखमी 
 काश्‍मीरमधील घडामोडी ही भारताची अंतर्गत बाब - अमेरिका
 पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवावे, शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे - मेबबूबा मुफ्ती
 भारतावर दबाव आणण्याची पाकिस्तानची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com