
केंद्राच्या निर्णयामुळे काहींना पोटदुखी : मोदी
प्रयागराज : ‘‘ मुलींचे विवाहाचे (Girls Marriage Age) वय २१ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने देशभरातील महिला आनंदी झाल्या असताना यामुळे काहींच्या मात्र पोटात दुखू लागले आहे.’’ अशी उपरोधिक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज येथे जाहीरसभेत बोलताना केली. ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत राज्यातील ३० लाखांपैकी २५ लाख घरांचे वाटप करण्यात आले असून त्यांची नोंदणी ही महिलांच्या नावे आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाबाबतची भाजपच्या कटिबद्धतेमधील सच्चेपणा दिसून येतो, असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले,‘‘ मुलींना शिकता यावे त्यांना प्रगती करता यावी म्हणून आम्ही त्यांच्या विवाहाचे वय हे २१ वर्षांपर्यंत वाढवीत आहोत. देशातील लेकींसाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत. आता या निर्णयामुळे कोणाला त्रास होतो आहे, हे सगळा देश पाहू शकतो. यामुळे काही मंडळींना दुःख होऊ लागले आहे.’’ मोदींचा टीकेचा रोख समाजवादी पक्षाच्या दिशेने होता.
योगींनी गुंडाराज संपविले
मोदींनी यावेळी समाजवादी पक्षाच्या राजवटीवर देखील टीका केली. ते म्हणाले, ‘‘ उत्तरप्रदेशात पाच वर्षांपूर्वी रस्त्यांवर माफियांचे राज्य होते. त्याकाळात आमच्या माता- भगिनींना त्रास सहन करावा लागला. मुलींना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाणे देखील कठीण झाले होते पण योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री होताच या गुंडांच्या मुसक्या आवळल्या.’’
विकासकामांचा धडाका
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उत्तरप्रदेशातील महिला स्वयंसहाय्यता गटाच्या नावे एक हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. सोळा लाख महिलांना याचा लाभ होईल. मुलींना आर्थिक साहाय्य व्हावे म्हणून अन्य एक लाख लाभार्थ्यांच्या नावावर वीस लाख रुपये जमा करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पौष्टिक अन्न घटकांची निर्मिती करणाऱ्या २०२ केंद्रांची पायाभरणी पार पडली.
मोदी म्हणाले ...
उत्तरप्रदेशमध्ये महिलांसाठी संधी आणि सुरक्षा
राज्याला कोणीही पुन्हा अंधारयुगात नेऊ शकत नाही
मुलींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न
‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’मुळे मुलींच्या संख्येत वाढ
हजारो वर्षांपासून प्रयागराज हे मातृशक्तीचे प्रतीक