esakal | 'मोदीजी, लखीमपूर खेरीला या'; ताब्यात असलेल्या प्रियांका गांधींनी दिलं आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur: 'मोदीजी, लखीमपूर खेरीला या'; प्रियांका गांधींनी दिलं आव्हान

Lakhimpur: 'मोदीजी, लखीमपूर खेरीला या'; प्रियांका गांधींनी दिलं आव्हान

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) याठिकाणी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतो आहे. या हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकरी आंदोलकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची काल धरपकड करण्यात आली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांना पोलिसांनी रोखून धरलं होतं. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत आहेत. याबाबतच आता प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी एका व्हिडीओद्वारे नरेंद्र मोदींना तुम्ही लखीमपूर खेरीला या, असं आवाहन केलं आहे. (Narendra Modi come to Lakhimpur Priyanka Gandhi who is in custody gave a challenge)

हेही वाचा: Lakhimpur Violence| शेतकऱ्यांना चिरडलेल्या अपघाताचा व्हिडिओ आला समोर

त्यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सर, तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेश अथवा एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदात्याला चिरडणाऱ्या या व्यक्तीला अद्याप अटक का करण्यात आली नाहीये? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय की, नरेंद्र मोदीजी नमस्कार, मी असं ऐकलं की तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आज लखनऊला येत आहात. मी तुम्हाला विचारु इच्छिते की, तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का? हा व्हिडीओ तुमच्या सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाला शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडतानाचे दृश्य दाखवतोय. हा व्हिडीओ पहा आणि देशाला सांगा की या मंत्र्याला अद्याप बरखास्त का करण्यात आलं नाहीये? तसेच या मुलाला अटक का करण्यात आली नाहीये? माझ्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्याला तर तुम्ही कसल्याही आदेश अथवा एफआयआरशिवाय डांबून ठेवलंय मग हा मुक्तपणे का फिरतोय?

हेही वाचा: ‘यूपी’त विरोधी नेत्यांची धरपकड

पुढे त्यांनी म्हटलंय की, आज तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात स्टेजवर असाल तेंव्हा हा विचार जरुर करा, की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते शेतकऱ्यांनीच मिळवून दिलंय. आजदेखील या देशाची सुरक्षा शेतकऱ्यांची मुले करतात. आज शेतकरी त्रस्त असून तो आपला आवाज उंचावू पाहतोय. मी तुम्हाला आग्रह करतोय की तुम्ही लखीमपूरला या. जो या देशाचा आत्मा आहे, त्यांची पिडा समजून घ्या. त्यांचं ऐकून बघा. ज्या संविधानाची तुम्ही शपथ घेतलीय त्यानुसार, शेतकऱ्यांचं ऐकणं तुमचा धर्म आहे. तेंव्हा जरुर या... असं प्रियंका गांधी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटंलय.

आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत म्हटलंय की, जिला तुम्ही ताब्यात ठेवलं आहे, ती घाबरत नाही. ती खरी काँग्रेसी आहे, ती हार मानणार नाही. सत्याग्रह थांबणार नाही, तो सुरुच राहिल, असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

loading image
go to top