अब की बार, तीनसो पार..!

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 311 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला अवघ्या सात जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 48 जागा मिळाल्या. भाजपच्या झंझावातासमोर मायावती यांच्या बसपला केवळ 19 जागाच मिळविता आल्या.

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर विधानसभा निकालांनी आज (शनिवार) शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 311 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला अवघ्या सात जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 48 जागा मिळाल्या. भाजपच्या झंझावातासमोर मायावती यांच्या बसपला केवळ 19 जागाच मिळविता आल्या.

उत्तराखंडातही या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. गलितगात्र झालेल्या काँग्रेसला पंजाबातील स्पष्ट बहुमतामुळे संजीवनी लाभली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये त्रिशंकू स्थिती असली, तरी या दोन्ही राज्यांत सर्वाधिक जागा मिळालेल्या काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एकंदर चित्र पाहता, मतदारांचा कौल परिवर्तनालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज फोल ठरवत भाजपने उत्तर प्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत मिळवत सत्तारूढ समाजवादी पक्षाची "सायकल' पंक्‍चर केली आणि बहुजन समाज पक्षाच्या "बहेनजीं'च्या "हत्ती'ला तिसऱ्या क्रमांकावर टाकून अंकुश लावला. ईशान्येकडील मणिपूरमध्येही मुसंडी मारून भाजपने राजकीय पंडितांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. 

उत्तराखंडात काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यावर दोन्ही मतदारसंघांत पराभवाची नामुष्की ओढावली तर गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मतदारांनी धूळ चारली. पंजाबातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कॅ. अमरिंदरसिंग यांना मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी लांबी मतदारसंघात पराभूत केले. मात्र, पतियाळातून अमरिंदरसिंग विजयी झाले. पंजाबात माजी मुख्यमंत्री राजींदर कौर भट्टल यांना पराभव पत्करावा लागला. 

मुख्यमंत्रिपदी अमित शहांची वर्णी शक्‍य 
दमदार विजयानंतर आता उत्तर प्रदेशला 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तयार करणे, असा नरेंद्र मोदींचा प्रयत्न असून, राज्याचा ताबा ते विश्‍वासू सहकारी अमित शहा यांच्याकडे सोपविण्याची दाट शक्‍यता व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाचे खरे हकदार म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. ओबीसी व इतर मागास वर्गांची मते भाजपकडे वळविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका अदा केली आहे. यानमित्ताने त्यांनी अवघे राज्य पिंजून काढले असून, प्रत्येक कानाकोपऱ्याची व तेथील राजकारणाची त्यांना चांगली ओळख आहे. हे सर्व लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी अमित शहा विराजमान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपला मतांचे दान 
लखनौ : राज्याच्या पश्‍चिम व पूर्व भागात असलेल्या 115 मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असून, येथे कोणता उमेदवार निवडून येणार यासाठी त्यांची मते निर्णायक मानली जातात. भाजपने या भागावर लक्ष्य केंद्रित केले होते. मात्र आतापर्यंत भाजपपासून लांब राहिलेल्या येथील मुस्लिम मतदारांनी या निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत 115 पैकी 22 जागांवर भाजपने यश मिळवले होते. तर आता 83 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. 

Web Title: Narendra Modi UP election Amit Shah BJP Akhilesh Yadav Rahul Gandhi