
PM मोदींचा युरोप दौरा; चार देशांच्या पंतप्रधानांची घेतली भेट
कोपेनहेगन : युरोपच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कमध्ये आज नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड या देशांच्या पंतप्रधानांची भेट घेत द्वीपक्षीय चर्चा केली. संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली, तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. मोदींच्या दौऱ्याचा आजचा अखेरचा दिवस होता. कोपेनहेगन येथे दुसरी भारत-नॉर्डिक परिषद झाली. या परिषदेसाठी आलेल्या नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड या देशांच्या प्रमुखांची मोदींनी स्वतंत्रपणे भेट घेत चर्चा केली. सुरुवातीला त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोर यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सागरी व्यापार, हरित ऊर्जा, अवकाश, आरोग्य आणि इतर काही क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली.
भारताने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्क्टिक धोरणात नॉर्वेला मोठे महत्त्व आहे, असे मोदींनी या भेटीची माहिती देताना सांगितले. यानंतर मोदींनी स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डेलेना अँडरसन यांची भेट घेतली. भारत आणि स्वीडनने संयुक्तपणे जाहीर केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा दोघांनी यावेळी आढावा घेतला. संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, शाश्वत ऊर्जा, स्मार्ट सिटी, कौशल्य विकास, अवकाश, विज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी २०१८ मध्ये हा कृती आराखडा जाहीर करण्यात आला होता. आज सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली.
मोदींनी फिनलँडच्या पंतप्रधान साना मरीन यांचीही भेट घेत डिजीटल भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, मोबाईल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली.
लिंग समानतेसाठी आइसलँडचे कौतुक
पंतप्रधान मोदींनी आज आइसलँडच्या पंतप्रधान कॅटरिन जोकोब्सदोतिर यांचीही भेट घेतली. लिंग समानतेसाठी आइसलँड सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल मोदींनी या देशाचे कौतुक केले आणि भारतातही त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. याशिवाय भूऔष्णिक ऊर्जा, सागरी व्यापार, अपारंपरिक ऊर्जा, मत्स्यव्यवसाय, अन्न प्रक्रिया, शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, संस्कृती या क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्यासाठीही चर्चा झाली. भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना यातील व्यापार चर्चेचाही दोघांनी आढावा घेतला.