ModiWithAkshay : मोदींनी सांगितली त्यांच्या बँक अकाउंटची कहाणी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

शाळेत असताना उघडलेल्या बँक खात्यात कधी पैसे भरलेच नाहीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

दिल्ली : सध्या अभिनेता अक्षय कुमारने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत देशभर चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीदरम्यान राजकीय कारकीर्द आणि सध्याच्या लोकसभा निवडणूका यांच्या व्यतिरिक्त मोदींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न केले गेले. यावेळी मोदींनी त्यांच्या बँक बँलन्स विषयी बोलताना बँक अकाउंटची कहाणी सांगितली.

नरेंद्र मोदी हे आमदार होण्याच्या आधीपर्यंत त्यांचे बँक अकाउंट नव्हते. हे खुद्द मोदींनी या मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. यावर मोदी म्हणाले, 'आमदार बनल्यानंतर माझा पगार सुरु झाला आणि माझे बँक खाते उघडले गेले. त्यानंतर मी गुजरातचा मुख्यमंत्री बनलो. पण तरी माझा माझ्या बँक खात्याशी थेट संबंध आला नाही. माझा स्टाफच माझे बँकेचे व्यवहार सांभाळत असे.'

अक्षय कुमार ने मोदींना त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या आधी आपल्या कमाईचे 21 लाख रुपये त्यांचे ड्रायव्हर, शिपाई यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी दिले होते, याबद्दल विचारले असता मोदी म्हणाले, 'मी पद सोडणार होतो आणि मी विचार केला इतक्या पैशांचं मी काय करणार. म्हणून हे माझे ड्रायव्हर, ऑफिसमध्ये काम करणारे शिपाई यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देण्याचं मी ठरवलं. पण माझ्या स्टाफमधील सगळ्यांनीच मला सर्व कमाई दुसऱ्यांना देऊ नका, असे समजावले. माझ्यावर गुजरातमध्ये काही कोर्ट केस सुरु होत्या. वकीलांची वाढती फी मला चुकवावी लागणार होती. शिवाय मला कधीही काही कामानिमित्त जर पैश्यांची गरज लागली, तर मला माझे पैसे परत मिळणार नाही, असे माझ्या स्टाफच्या अधिकाऱ्यांनी मला समजावले. तेव्हा त्यांच्या सूचना लक्षात घेत मी माझ्या कमाईतील 21 लाख एवढा हिस्सा माझ्या ड्रायव्हर, शिपाईंना दिला.'

  • शाळेत असताना उघडलेल्या बँक खात्यात कधी पैसे भरलेच नाहीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

'शाळेत असताना लहानपणी एकदा आमच्या गावात देना बँकने बँक स्थापन केली. त्यांच्या अधिकाऱ्यांनी आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांचे खाते उघडून दिले. बँकेत उघडलेल्या खात्यात मी कधी पैसे भरुच शकलो नाही, कारण माझ्याकडे पैसेच नसायचे. त्यानंतर 30-35 वर्ष माझे खाते त्या बँकेत होते. मी गाव सोडून खूप वर्ष झाले होते. मी राजकारणात आहे हे त्या अधिकाऱ्यांना कळले आणि ते मला शोधत आले. त्यांनी मला तुमचं लहानपणीचं बँक खातं बंद करायचंय म्हणून सही मागितली. तेव्हा ते खातं बंद झालं.'

 

Web Title: Narendra Modi Explains his Bank Account Story with Akshay Kumar in Interview