
मोदीजी, मुलं पेन्सिल चोरतायंत; महागाईवरुन ६ वर्षांच्या चिमुकलीचं पत्र Viral
कनौज : देशात महागाई प्रचंड वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. यामुळे सरकारचा विरोध करण्यात येत आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. खाण्यापासून ते वाचनापर्यंतच्या गोष्टीही महाग झाल्या आहेत. याचा सर्वांना फटका बसत आहे. महागाईविरोधात काँग्रेस ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहे. यापूर्वी एका चिमुकलीने पंतप्रधानांना महागाईबाबत पत्र लिहिले आहे.
कन्नौज जिल्ह्यातील छिब्रामौ शहरातील मोहल्ला बिर्तिया जनता मंदिर येथील अधिवक्ता विशाल दुबे यांची मुलगी कृती दुबे हाउसिंग डेव्हलपमेंट कॉलनीत असलेल्या सुप्रभाश अकादमीमध्ये पहिलीत शिकते. नुकतेच सरकारने कॉपी-बुक, रबर आणि पेन्सिलवर कर लादले आहे. वाढलेल्या महागाईने नाराज झालेल्या कृती दुबे या चिमुकल्या विद्यार्थिनीने ‘मन की बात’ लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
‘मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिल (Pencil), रबरही महाग झाले आहे. माझ्या मॅगीचेही भाव वाढले आहे. आता पेन्सिल मागितली तर आई मला मारते. मी काय करू. इतर मुले माझी पेन्सिल चोरतात’ असे कृती दुबेने पंतप्रधानांना (Narendra Modi) पत्राद्वारे कळवले आहे. हे पत्र पोस्ट पण केले आहे.
वाढलेल्या किमतींचा उल्लेख
पेन्सिल-रबरच्या वाढलेल्या किमतींनी (Inflation) मुलीला अस्वस्थ केले. यामुळे तिने आपले म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मुलीने खाण्या-पिण्यापासून वाचन-लेखनापर्यंतच्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतींचा उल्लेख केला आहे. यातून तिने महागाईवर नाराजी व्यक्त केली आहे.