esakal | कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी दिले सणसणीत प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi

तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर घेऊन जाते का? असा उपरोधिक सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना आज पुन्हा प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी कृषी कायद्यांतील त्रुटी दाखवून द्याव्यात, सरकार त्यावर चर्चा करायला तयार आहे, असे ते म्हणाले

कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी दिले सणसणीत प्रत्युत्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर घेऊन जाते का? असा उपरोधिक सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना आज पुन्हा प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी कृषी कायद्यांतील त्रुटी दाखवून द्याव्यात, सरकार त्यावर चर्चा करायला तयार आहे, असे ते म्हणाले. 

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘पीएम किसान सन्मान’ निधीच्या ९ कोटींहून जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधानांच्या हस्ते आज  १८ हजार कोटींचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २-२ हजार रुपये थेट जमा झाले. देवाने आम्हालाच सारी बुध्दी दिल्याचा आमचा दावा नाही. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या सांगाव्यात. लोकशाहीत चर्चा-संवाद तर हवाच, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात मोदींनी दिल्लीतील आंदोलनावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क आहे पण त्यांच्या नावावर त्यांची दिशाभूल करू नये‘ फोटो छापून येण्यासाठी सध्या दिल्लीत शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनी वर्षानुवर्षे सत्तेवर राहून छोट्या शेतकऱ्याला बरबाद का व कसे केले ? ३०-३० वर्षे बंगालमध्ये राज्य करणाऱ्यांनी त्या राज्याची काय दुर्दशा केली ? दिल्लीत येऊन शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनी केरळमध्ये बाजार समिती कायद्यासाठी दारे  का बंद केली आहेत? पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय कारणांसाठी केंद्राच्या कल्याणकारी योजना अडवून दिल्लीत येऊन देशाची अर्थव्यवस्था बरबाद करण्यासाठी कोण उतरले आहे ? असे प्रहार करून मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्य ऐकावेच लागेल
शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःचे झेंडे घेऊन खेळ करणाऱ्यांना, राजकीय मैदानात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या रूपात जडीबुटी शोधणाऱ्यांना आता सत्य ऐकावे लागेल. देशात इतकी वर्षे राज्य करून त्यांच्या धोरणांमुळे छोटा शेतकरी सर्वाधिक बरबाद झाला. 
आजच्या कार्यक्रमात मोदींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा येथील गणेश भोसले यांच्यासह विविध राज्यांतील निवडक शेतकऱ्यांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार व आमदार ठिकठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोदींचा खोटा प्रचार; ममतांचा पलटवार 

मोदींचा सवाल
अरुणाचल प्रदेशात आल्याची  शेती करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गगन पेरिंग या शेतकऱ्यांशी बोलताना मोदींनी त्याला, तुमच्या जमिनीतील आल्याचे पीक घेऊन जाणारी कंपनी जमीनही बरोबर नेते का? असे हसत हसत विचारले त्यावर पेरिंग यांनी, नाही, जमीन कोणी घेऊन जात नाही, असे सांगितल्यावर मोदी म्हणाले. तुम्ही इतक्‍या दूर अरुणाचल प्रदेशात बसला आहात व तुमची जमीन सुरक्षित आहे, असे सांगत आहेत आणि इथे दिल्लीत तेच खोटे पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम तरुणीने मोडला; 21 व्या वर्षी झाली सर्वात तरुण महापौर!

पंतप्रधान म्हणाले

  • कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना विक्रीचे स्वातंत्र्य
  • आंदोलक शेतकऱ्यांना विरोधक खोटे सांगतात
  • शेतकऱ्याच्या सुखातच मी माझे सुख पाहतो
  • प. बंगालचे शेतकरी आडमुठेपणामुळे मदतीपासून वंचित
  • शेतकऱ्यांनी अर्ज करूनही राज्याने व्हेरिफिकेशन रोखले
  • स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना जनता बारकाईने पाहते आहे

सरकारशी चर्चेबाबत उद्या निर्णय
केंद्र सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावावर आंदोलक शेतकरी नेते उद्या (ता.२६) रोजी निर्णय घेणार आहेत. कृषी मंत्रालयाकडूनच त्यांना हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दुसरीकडे आज अनेक ठिकाणांवर शेतकरी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंजाबमधील भटिंडा येथे शेतकऱ्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमातच गोंधळ घातला. उत्तराखंडमधील उधमसिंग नगर येथे आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडवर ट्रॅक्टर घातल्याने तणाव निर्माण झाला होता. पंजाबमधील पगवाडा जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या वास्तव्य असलेल्या हॉटेलला घेराओ घातला होता, त्यामुळे त्यांच्यावर मागील दाराने पळ काढण्याची वेळ आली.

कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आहे का? 4 राज्यात होणार रंगीत तालीम

केंद्राने काहीही केलेले नाही - ममता बॅनर्जी
कोलकता - राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्र सरकार खोटा प्रचार करत आहे. आमचे सरकार केंद्राला सहकार्य करते पण केंद्र मात्र राज्याच्या हिताच्या योजना रोखते. केंद्राकडून ८५ हजार कोटी रुपये येणे आहेत, त्यातील ८ हजार कोटी रुपये जीएसटीची थकबाकी असल्याची टीका पश्‍चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. मोदींनी प. बंगालसाठी काहीही केलेले नाही, आता ते केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत असेही बॅनर्जी म्हणाल्या.

कृषी कायद्यांवर केंद्र सरकारला खुलेपणाने चर्चाच करायची नाही. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी संसदेचे अधिवेशन घेऊन या कायद्यांबाबत चर्चा करावी.
- अधीररंजन चौधरी, नेते, काँग्रेस

Edited By - Prashant Patil

loading image